ब्रिटनकडे असलेल्या जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारच्या भूमिकेला छेद देणारी माहिती दिली आहे. एप्रिल २०१६ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात  कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली. कोहिनूर हिरा ब्रिटिशांनी जबरदस्तीने किंवा चोरुन नेला नाही. महाराज रणजित सिंग यांच्या वारसांनी ईस्ट इंडिया कंपनीला हा हिरा भेट म्हणून दिला होता असे सांगितले होते.

आता भारतीय पुरातत्व विभागाने बिलकुल याविरुद्ध माहिती दिली आहे. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता असे पुरातत्व विभागाने म्हटले आहे. अँग्लो-शिख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंग यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.

कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय अंतर्गत अर्ज करुन कुठल्या आधारावर कोहिनूर हिरा ब्रिटनकडे सोपवण्यात आला त्याची माहिती मागितली होती. कोहिनूरविषयी माहिती मिळवण्यासाठी आरटीआय अर्ज नेमका कोणाकडे करायचा हे मला समजत नव्हते. मी पंतप्रधान कार्यालयाकडे माझा अर्ज पाठवला त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे तो अर्ज पाठवून दिला. आरटीआय कायद्यातंर्गत एक यंत्रणा दुसऱ्या यंत्रणेकडे अर्ज पाठवू शकते.

भारताने कोहिनूर ब्रिटनला गिफ्ट केला कि, त्यामागे काही अन्य कारण होते असा प्रश्न सबरवाल यांनी आपल्या याचिकेत विचारला होता. १८४९ साली लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलीप सिंग यांच्यात लाहोर करार झाला. त्यावेळी लाहोरच्या महाराजांनी हा हिरा इंग्लंडच्या राणीच्या ताब्यात दिला अशी माहिती एएसआयने दिली. दुलीप सिंग यांच्या इच्छेने कोहिनूर हिरा ब्रिटिशांना देण्यात आला नव्हता असे या करारातून दिसते असे एएसआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे. हा करार झाला त्यावेळी दुलीप सिंग लहान होते.