नवाबी थाटाच्या कोहितूर आंब्याला भौगोलिक ओळखीची प्रतीक्षा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कोहितूर आंब्याला भौगोलिक ओळख मिळावी, यासाठी पश्चिम बंगाल सरकारने प्रयत्न सुरू केले असून फळांचा राजा असलेल्या आंब्याची ही प्रजाती फार महत्त्वाची असून या प्रकारचे आंबे नवाब सिराज उदौला याच्या काळात केवळ राजघराण्यातील व्यक्तींसाठी होते, आता यातील एका आंब्याची किंमत १५०० रुपये आहे. हा मौल्यवान आंबा नाजूक असून तो हाताने हळूच काढून कापडात ठेवावा लागतो. अठराव्या शतकात बंगालमध्ये नवाबांच्या काळात ही  प्रजाती विकसित झाली. सामान्य लोक हा आंबा खरेदी करू शकत नाहीत. केवळ राजघराण्यातील लोकच या आंब्याचे पीक घेऊ शकतात. आधुनिक काळात काही मूठभर श्रीमंतांनाच हे आंबे परवडतात. मुर्शिदाबादच्या नवाबांच्या या आंब्याला भौगोलिक ओळख मिळवली जाणार आहे.

कोहितूर ही आंब्याची प्रजाती पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात आहे. जिल्ह्य़ात त्याचे १४८ प्रकार असून आता ४२ शिल्लक उरले आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आता आम्ही कोहितूर आंब्याला भौगोलिक ओळख मिळण्यासाठी अर्ज केला आहे, असे मुर्शिदाबादचे फलोद्यान उपसंचालक गौतम रॉय यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील आंबा महोत्सवात सध्या हे आंबे विक्रीस आहेत.

त्या वेळचा राजा सिराज उद्दौला याने मुर्शिदाबाद येथील त्याच्या बगिच्यासाठी देशातील चांगल्या आंब्याची रोपे मागवली होती. त्याने आंब्यांच्या रोपांची लागवड करण्यासाठी अकबराच्या नवरत्नांच्या समकक्ष असलेले लोक नेमले होते. त्यांनी या रोपांवर संशोधन करून कलमी आंबे तयार केले. त्यातील कोहितूर ही नवीन संकरित जात होती, ती लोकप्रिय ठरली अशी कथा आहे. कालोपहार व आणखी एका आंब्याच्या प्रजातीचे कलम करून हकमी अदा महंमदी याने आंब्याची कोहितूर प्रजात तयार केली.  कालोपहार हा काळसर हिरव्या सालीचा आंबा असतो.

दुर्मीळ कोहितूर

कोहितूर आंबाही आता दुर्मीळ होत आहे, त्याचे केवळ १० ते १५ उत्पादक आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात कोहितूरची केवळ २५-३० झाडे आहेत. पश्चिम बंगालमध्ये २०० आमराया असल्या, तरी फार थोडय़ा ठिकाणी हे आंबे आहेत. काही ठिकाणी दीडशे वर्षांपूर्वीची आंब्याची झाडे आहेत. कोहितूर आंब्याच्या झाडाला एका मोसमात ४० आंबे येतात. त्यामुळे त्यांची किंमत जास्तच आहे. एका आंब्याची किमान किंमत पाचशे रुपये असते पण गेल्या मोसमात एक आंबा १५०० रुपयांना याप्रमाणे विक्री झाली. हा आंबा चाकूने कापता येत नाही तो बांबूच्या चाकूने कापावा लागतो कारण तो नाजूक असतो. नवाबांच्या काळात सोन्याच्या दात कोरण्याने हे आंबे कापले जात असत. यापूर्वी रत्नागिरी व देवगड हापूस यांना व्यापार मंत्रालयाने भौगोलिक ओळख दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohitur mango priced at rs 1500 a piece
First published on: 25-06-2018 at 02:10 IST