माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोलकाता येथील न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केलं आहे. गतवर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान शशी थरुर यांनी केलेल्या ‘हिंदू पाकिस्तान’ वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. वकील सुमीत चौधरी यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोलकातामधील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे वॉरंट जारी केलं.

गतवर्षी जुलै महिन्यात शशी थरुर यांनी वक्तव्य केलं होतं की, “भारतीय जनता पक्षाने जर २०१९ लोकसभा निवडणूक जिंकली तर हिंदू पाकिस्तान निर्माण होईल अशी परिस्थिती असेल”. तिरुअनंतपुरम येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

“भाजपा एक नवं संविधान तयार करत आहे, जे हिंदू राष्ट्राच्या सिद्धातांवर आधारित असेल. हे संविधान अल्पसंख्यांकाचा समानतेचा अधिकार संपवेल आणि देशाला हिंदू पाकिस्तान करण्याचा मार्ग मोकळा होईल. महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि स्वातंत्र्य लढ्यातील इतर महान नेत्यांनी अशा देशासाठी लढाई लढली नव्हती”, असं शशी थरुर यांनी म्हटलं होतं.

यानंतर भाजपाने शशी थरुर यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच राहुल गांधी यांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती.