अहमदाबाद ते मुंबई असा बुलेट ट्रेनचा कागदावर प्रस्ताव असला आणि कामाला सुरूवात झाली असली तरी तिला होणारा विरोध पाहाता भारतात बुलेट ट्रेन कधी येईल हे सांगता येत नाही. वेगवान ट्रेनमध्ये बसून काही तासांमध्ये दोन राज्यांमधले अंतर काटायचे हे भारतीयांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. मात्र, कोलकातामध्ये बुलेट ट्रेन धावाली आहे. पण ही खरीखुरी बुलेट ट्रेन नव्हे. तर दुर्गापूजाच्या मंडपामध्ये करण्यात आलेल्या देखाव्यातील बुलेट ट्रेन आहे. हुबेहुब बुलेट ट्रेनसारखी दिसणारी ही टॉय ट्रेन आहे.

कोलकातातील कॉलेज स्ट्रीटवर असलेल्या दुर्गापूजा मंडळामध्ये तुम्ही ही बुलेट ट्रेन पाहू शकता. तीन डब्याच्या या बुलेट ट्रेनसाठी ट्रक(रूळ)ही लावण्यात आले आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मंडपात ट्रॅक, स्टेशन, सिंग्नल आणि प्लॅटफॉर्मसह बुलेट ट्रेन दिसते.

ही ट्रेन ज्यावेळी स्टेशनवर थांबते त्यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेली ऑटोमॅटिक गेट उघडते. त्यानंतर बुलेट ट्रेनची दरवाजेही उघडतात. सोशल मीडियावर सध्या या बुलेट ट्रेनची जोरदार चर्चा आहे. ही बुलेट ट्रेन तयार करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला होता. २० फूट लांब बुलेट ट्रेन तयार करण्यासाठी ७० हजार रूपये लागले.

कोलकातामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.  नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ रूपेच. सध्या देशभरात नवरात्रीची उत्साह सुरू आहे. दुर्गा म्हणजे शक्ती. या शक्तीची आराधना देशभरात विविध पध्दतीने केली जाते. भक्त देवीची स्थापनाही मनोभावाने करतात.