कोलकात्यातील बडाबाजार या अत्यंत गजबजलेल्या परिसरात बांधकाम अवस्थेत असलेला उड्डाणपूल अचानक कोसळल्या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी पुलाच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या कंपनीतील पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच यामध्ये काही घातपात तर नाही ना, याचा तपास करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून काही नमुनेही घेतले आहेत.
दरम्यान, या घटनेवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला. तर या स्थितीत राज्य सरकारवर आरोप करणे घाणेरडे राजकारण असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जण ठार तर ६० हून अधिक जण जखमी झाले. शुक्रवारी सकाळीही लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू होते. दुपारच्या सुमारास पुलाचा राडारोडा संपूर्णपणे हटविण्यात आला आहे. येथील बडाबाजार हा अत्यंत गजबजलेला बाजार परिसर आहे. या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाचा काही भाग गुरुवारी दुपारी अचानक कोसळला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेचे वृत्त समजताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), पश्चिम बंगालचे आपत्ती व्यवस्थापन, शहर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या बचावकार्याला सुरुवात केली. गुरुवारी रात्री उशिरा लष्कराला पाचारण करण्यात आले होते.