पश्चिम बंगालमध्ये बदुराई येथे नवजात अर्भकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या नवजात अर्भकांची बिस्कीटांच्या बॉक्समधून तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना केली आहे.

पश्चिम बंगालमधील बदुराई येथील नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकांची विक्री केली जात होती. नर्सिंग होममध्ये येणाऱ्या गरीब, दुर्बल लोकांना तुमचे बाळ दगावले आहे, अशी खोटी माहिती तेथील कर्मचारी देत होते. त्यानंतर बिस्कीटांच्या बॉक्समधून नवजात अर्भक घेऊन जात होते आणि त्यांची विक्री केली जात होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या टोळीच्या मागावर होते. सोमवारपासून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केले. यावेळी बदुराईमध्ये नवजात अर्भकांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर जेसौर येथील डॉ. संतोष सामंथा याच्यासह तीन महिलांना अटक करण्यात आली आहे, असे सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक भारत लाल मीना यांनी सांगितले.

श्रीकृष्णा नर्सिंग होममध्ये काम करणारा डॉ. सामंथा याला काही तासांपूर्वीच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर सामंथाला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या टोळीत सामील असलेल्या परमिता चॅटर्जी, प्रभा परमाणिक आणि पुतूल बॅनर्जी या तिघा महिलांनाही अटक करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

बदुराईच्या उत्तर २४ परगणा येथील दोन खासगी रुग्णालयांतून नवजात अर्भकांच्या तस्करीचे रॅकेट चालवण्यात येत होते. गेल्या तीन वर्षांपासून एका एनजीओच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री सीआयडीचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी बागजोला येथील बैद्य क्लिनिक आणि सोहोन नर्सिंग होमवर छापे टाकले. त्यावेळी तीन नवजात अर्भक त्याठिकाणी आढळून आले. त्यातील दोन अर्भके बिस्कीटच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील एकाला त्याची आई सहिदा बीबी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तुम्ही मृत मुलाला जन्म दिला आहे, असे नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते, अशी माहिती दोगांगा येथील रहिवासी असलेल्या सहिदा बीबी यांनी पोलिसांना दिली. आम्हाला अटक करण्यात आलेल्या महिलांबद्दलची माहिती चौकशीदरम्यान मिळाली होती. वेगवेगळ्या नर्सिंग होममध्ये या महिला काम करत असल्याची माहितीही मिळाली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, सोमवारी सीआयडी आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी सत्यजित सिन्हा, नझमा बीबी, बैकबुल बैद्य, उत्पल ब्यापारी, प्रभात सरकार, झांतू बिश्वास आणि असादूर जामन यांना अटक केली होती, अशी माहिती सीआयडीचे पोलीस महासंचालक मीना यांनी दिली. कुमारी माता आणि गरीब पालकांना ते आपल्या जाळ्यात ओढायचे. बोगस कागदपत्रे तयार करून मुले नसलेल्या जोडप्यांना नवजात अर्भकांची विक्री केली जात असे, अशी माहितीही त्यांनी दिली.