पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फतवा काढणारे टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुर-उर रहमान बरकती यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. बरकती यांनी देशविरोधी विधान करत मुस्लिम समाजाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना शाही इमामपदावर राहता येणार नाही असे सांगत मशिदीच्या विश्वस्त मंडळाने बरकती यांना हटवल्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणली होती. केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी सरकारी गाड्यांवरील लाल दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाला पश्चिम बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरूर रहमान बरकती यांनी आव्हान दिले होते. माझ्या गाडीवरील लाल दिवा मोदीही हटवू शकणार नाही असे आव्हान देतानाच बरकती यांनी थेट मोदींविरोधात फतवा काढला होता.

मोदींविरोधात फतवा काढणे बरकती यांना महागात पडले आहे. टिपू सुलतान मशिदीच्या विश्वस्त मंडळाने बरकती यांना शाही इमाम पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बरकती यांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला असून शाही इमामपदावर काम करण्यास ते योग्य नाहीत असे विश्वस्त मंडळाने म्हटले आहे. विश्वस्त मंडळाचे प्रमुख शहजादा अन्वर अली शाह यांनी ही माहिती दिली. बरकती यांनी मशिदीच्या आवाराचा खासगी कामांसाठी वापर केल्याचा दावाही शाह यांनी केला. बरकती यांनी कुटुंबातील लग्नसमारंभ, पत्रकार परिषद यासाठी मशिदीच्या आवाराचा वापर केल्याचे अन्वर अली शाह यांनी सांगितले.

नुर-उर रहमान बरकती हे गेल्या अनेक वर्षांपासून टिपू सुलतान मशिदीच्या शाही इमामपदी होते. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याने बरकती हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. या वादग्रस्त विधानांमुळे बरकती यांना ममता बॅनर्जींचाही पाठिंबा मिळू शकला नाही अशी चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला लाल दिव्याची गाडी वापरण्याची परवानगी दिल्याचा दावा बरकती यांनी केला होता. आमच्या पाठिंब्यामुळेच सध्याचे सरकार सत्तेत असल्याचे त्यांनी म्हटले होते.