चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच हे आपण सर्वांनी अनुभवलं असेलच. पुण्यासारख्या शहरात तर चहाला अमृततुल्यचा दर्जा देण्यात आला आहे. बासुंदी चहा, तंदुरी चहा, इराणी चहा, कश्मिरी कावा असे बरेच प्रकार आपण ऐकले असतीलच, तसेच त्यांच्या वेगवेगळ्या किंमतीही तुम्हाला माहिती असतील. पण कधी १००० रूपये किंमतीचा चहा तुम्ही प्यायला आहात का? हो तुम्ही अगदी बरोबर ऐंकलत. कोलकत्त्यातील एका दुकानात तुम्हाला एक कप चहासाठी १००० रूपये मोजावे लागतात.

कोलकाता येथे राहणाऱ्या पार्थ प्रतिमा गांगुलीन यांनी मुकुंदपूर येथे निर्जश या नावाने आपले चहाचे स्टॉल सुरू केले आणि एका कपसाठी १२ रूपये ते १ हजार रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची विक्री सुरू केली. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार, निर्जश येथे जवळपास १०० वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात.

एक हजार रुपये किंमतीचा चहाचे नाव बो-ले चहा आहे आणि त्याची किंमत ३ लाख रुपये प्रति किलो आहे. चहाच्या इतर प्रकारांमध्ये सिल्वर निडल व्हाइट चहा, लव्हेंडर चहा, हिबिस्कस चहा, वाइन चहा, तुळशी आले चहा, ब्लू टिस्ने चहा, तीस्ता व्हॅली चहा, मकाबेरी चहा, रुबिओस चहा आणि ओकायटी चहा सारख्या अनेक स्वादांचा समावेश आहे.

सात वर्षांपूर्वी पर्यंत, पार्थ प्रतिमा गांगुली एका कंपनीत काम करत होते आणि तेच करत राहण्याचा विचार करत होते. परंतु, नंतर पार्थने आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि चहाचा स्टॉल सुरू करण्याचा विचार केला.

निर्जश २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते आणि ते कोलकत्त्यातील एक लोकप्रिय चहाचे स्टॉल आहे.