गुन्हेगार कायम एखादा पुरावा मागे सोडून जातो असं म्हटलं जातं. कोलकात्यामध्येही एका चोराने चोरी करताना चुकून आपली एक स्लीपर घटनास्थळीच सोडली. पोलिसांनीही केवळ या स्लीपरच्या आधारे अवघ्या ४० मिनिटांमध्ये चोराला अटक केली.

कोलकात्यामधील न्यू अलीपोरे भागातील अरिंदम चॅटर्जी या सेल्स एक्झीक्युटीव्हच्या घरात १९ वर्षीय शेख राजेश या चोराने डल्ला मारला. रात्री अडीच वाजता चोरी करण्यासाठी शेख घरात शिरला. त्याने रोख रक्कम आणि दोन मोबाइल चोरले. मात्र अचानक अरिंदम यांना जाग आल्याने शेखने घाई गडबडीत पळ काढायचा प्रयत्न केला. अरिंदम यांनी चोराला त्यांच्या बेडरुम बाहेर पडळताना पाहिले. अरिंदम आधी घाबरले. त्यांनी लगेच पोलिसांनी फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने तपास करण्यासाठी अरिंदम यांच्या घरी पोहचले. काही मिनिटांमध्येच हा चोर पाईपवरुन चढून पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरात शिरल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. खिडकी तोडून हा चोर घरात शिरल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. इमारतीच्या संरक्षक भिंतीजवळ पोलिसांना एक स्लीपर पडलेली अढळली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यासाठी दोन तुकड्या बनवल्या. यापैकी एका तुकडीला काही अंतरावरच एक तरुण रस्त्याच्या कडेला बसून स्लीपरशी खेळताना दिसला. ही स्लीपर चोरी झालेल्या इमारतीच्या संरक्षण भितीजवळ सापडलेल्या स्लीपर सारखीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतले.

आधी चोरी केल्याचे नाकारणाऱ्या शेखला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने लगेच गुन्हा कबूल केला. पोलिसांनी चोरीला गेलेले दोन्ही मोबाइल आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.