पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून शीघ्र कृती दलाने (एसटीएफ) बांगलादेशी दहशतवादी संघटना नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांगलादेश आणि इस्लामिक स्टेटच्या (इसिस) चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी तीन नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांगलादेश आणि एक इसिसचा संशयित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बांगलादेशच्या अटक केलेल्या संशयितांकडून मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक सामग्री जप्त करण्यात आली आहे.

दोन संशयित दहशतवाद्यांना सोमवारी सियालदाह रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आली. तर अन्य दोन संशयितांना हावडा रेल्वे स्थानकावरून मंगळवारी अटक करण्यात आली. तसेच आणखी एका भारतीय नागरिकालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला. त्यामध्ये जिहादशी निगडीत अनेक फोटो, व्हिडीओ आणि मेसेजसही सापडले आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही आपत्तीजनक पुस्तकेही सापडली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून त्यांचे भारतात येण्याच्या कारणाचा तपास करित आहेत.

नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांग्‍लादेश या संघटनेचे संशयित दहशतवादी भारतात आपल्या संघटनेसाठी पैसा गोळा करत होते. तसेच आपल्या संघटनेसाठी लोकांची भरतीही करत होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांग्‍लादेश ही दहशतवादी संघटना इसिस या दहशतवादी संघटनेशी जोडलेली एक दहशतवादी संघटना आहे. तसेच बांगलादेश सरकाने यावर बंदीदेखील घातलेली आहे. या संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी काही महिन्यांपूर्वीच एका ऑस्ट्रेलियाच्या नागरिकावर चाकूने हल्ला केला होता.

नियो जमियतुल मुजाहिद्दिन बांग्‍लादेश या दहशतवादी संघटनेतून फुटून नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांग्‍लादेश या संघटनेची निर्मिती झाली आहे. जमियतुल मुजाहिद्दिन बांग्‍लादेश ही संघटनादेखील इसिसशी जोडलेली संघटना आहे. 2016 मध्ये बांगलादेशमध्ये एका हॉटेलवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात या संघटनेचा हात होता. यामध्ये 20 नागरिकांचा मृत्यू झाला होता.