तब्बल एक कोटी रूपयांची फसवूणक केल्याप्रकरणाी कोलकाता पोलिसांनी भाजप नेते अनुपम दत्ता यांनी डमडम विमानतळावरून अटक केली. सॉल्ट लेक येथील दिप्ती सेन यांच्या मृत बहिणीचे घर विकून फसवणूक केल्याचा दत्ता यांच्यावर आरोप आहेत. कट रचणे आणि फसवणूक करणे असे गुन्हे पोलिसांनी नोंदवले आहेत. दिप्ती सेन यांच्या तक्रारीनुसार त्यांनी आपली जमीन एक तिसरी व्यक्ती मधुसुदन चक्रवर्ती यांच्या मध्यस्थीने विकली होती. दत्ता यांनी चक्रवर्ती यांची सेन यांच्याशी ओळख करून दिली होती. सध्या याप्रकरणी चक्रवर्ती जामिनावर सुटलेला असल्याची माहिती पोलीस अधिकारी संतोष पांडे यांनी दिली.

सेन यांनी दि. ३ जुलै रोजी दोन्ही संशयितांविरोधात तक्रार दाखल केली होती. सेन यांना त्यांची बहीण बानी डे यांच्या मृत्यूनंतर तिचं घर विकायचं होतं. त्यावेळी त्यांचा संपर्क अपनुपम दत्ता यांच्याशी झाला. दत्ता यांनी सेन यांची भेट मधुसूदन चक्रवर्ती यांच्याशी करून दिली. बहिणीच्या मृत्यूपूर्वी जमीन तुमच्या नावे प्रोबेट केले नसल्याचे चक्रवर्ती यांनी सेन यांना सांगितले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिवंगत बहिणीच्या मृत्यूपत्राची नोंदणी करायची असते, असे सांगितले. कायदेशीररित्या हे योग्य नाही. पण चिंता करू नका, मी तुम्हाला सर्व करून देईन, असे सांगितले.

जमिनीचा १.१ कोटी रूपयांचा व्यवहार ठरला. परंतु, चक्रवर्तीने केवळ ६९ लाख रूपयेच दिले. त्याशिवाय सेन यांच्यावरच त्यांनी फसवणूक करून आपल्या मृत बहिणीचे घर विकल्याचा आरोप केला. पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे सेन यांनी दत्ता आणि चक्रवर्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सध्या दत्ता यांना पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे. हे माध्यमांचे षडयंत्र असून हा राजकीय कट असल्याचा आरोप दत्ता यांनी केला आहे.