जर्मनीत काम करणाऱ्या अभियंत्याला लग्नाचे आश्वासन देत त्याला ४१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या अभिनेत्रीला कोयंबतूर पोलिसांनी अटक केली. पी. श्रृती (२१) असे या अभिनेत्रीचे नाव असून तिचा एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता, असे तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी श्रृतीसह तिची आई, भाऊ आणि आणखी एकाला अटक केली आहे.

सालेममधील बालमुरुगन हा जर्मनीतील ऑटोमोबाईल कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. मे २०१७ मध्ये श्रृतीने बालमुरुगनशी एका मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून संपर्क साधला. श्रृतीने मैथिली व्यंकटेश या नावाने बालमुरुगनशी संपर्क साधला होता.

मला ब्रेन ट्यूमर असून माझ्या आईलाही गंभीर आजार आहे. आम्हाला उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे तिने बालमुरुगनला सांगितले होते. मे २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत त्याने श्रृतीला टप्प्याटप्प्यात तब्बल ४१ लाख रुपये दिले. काही दिवसांपूर्वी श्रृतीचे फोटो बालमुरुगनने त्याच्या मित्रांना दाखवले. यातील एकाने श्रृतीने अशाच पद्धतीने आणखी काही तरुणांना फसवले होते, असे सांगितले. यानंतर बालमुरुगनने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्रृतीसह चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमधील एकाने स्वतःची ओळख श्रृतीचे वडील म्हणून करुन दिली होती. मात्र, पोलीस तपासात ती व्यक्ती श्रृतीची वडील नाही, असे समोर आले आहे. या चौघांनी आणखी किती लोकांना फसवले, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. श्रृतीने अभिनेत्री असल्याचा दावा केला असून एका चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले होते, असे तिने पोलिसांना सांगितले.