उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला थोपविण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी उत्तर कोरियाचे नेते ‘रॉकेट मॅन’ कीम जोंग ऊन यांच्याशी चर्चा करू नये, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

टिलरसन उत्तर कोरियाशी चर्चा करतील असे गृहीत धरून ट्रम्प यांनी चर्चेला विरोध दर्शविल्याने ट्रम्प आणि टिलरसन यांच्यात उत्तर कोरियाचा प्रश्न हाताळण्यावरून मतभेद असल्याच्या शक्यतेला खतपाणी घातले गेले आहे.

यापूर्वी माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बराक ओबामा हे उत्तर कोरियाच्या आघाडीवर अपयशी ठरले आहेत, मात्र आपण अपयशी ठरणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

किम जोंग ऊन यांच्याशी चर्चा करून आपण कालापव्यय करीत आहात, असे आपण टिलरसन यांना सांगितल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. टिलरसन आपली ऊर्जा राखून ठेवा, जी पावले उचलावयाची आहेत ती आपण उचलू, असे ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे.

कीम जोंग ऊन यांच्याशी चर्चा करण्यात २५ वर्षे लोटली, त्याचा काहीही फायदा झाला नाही, तर तो आता का होईल, असा सवाल त्यांनी केला. क्लिंटन, बुश आणि ओबामा यांना अपयश आले, मात्र आपल्याला अपयश येणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

टिलरसन चीनमध्ये असून त्यांनी म्हटले आहे की, आण्विक कार्यक्रमावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिका उत्तर कोरियाच्या थेट संपर्कात आहे.