चीनमध्ये सार्ससदृश विषाणूचा प्रसार वाढत असून आतापर्यंत तीन  बळी गेले आहेत. हा विषाणू आतापर्यंत आशियातील तीन देशात पसरला असून त्यामुळे चीनमधील नववर्षांच्या स्वागतावर चिंतेचे सावट आहे. नवीन कोरोना विषाणू हा पहिल्यांदा मध्य चीनमधील वुहान शहरात दिसून आला त्यामुळे चिंता निर्माण झाली. या विषाणूमुळे सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हा रोग होतो.

२००२-२००३ या काळात चीन व हाँगकाँग या भागात त्यामुळे ६५० लोक मरण पावले होते. वुहानमध्ये एकूण १.१० कोटी रहिवासी असून ते मोठे वाहतूक ठिकाण आहे. चीनचे नव चांद्र वर्ष या आठवडय़ात सुरू होणार असून त्यानिमित्ताने लोकांचे पर्यटन वाढले आहे. आता या विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत तिसरा जण मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाले आहे.  १३६ नवीन रुग्णांना त्याची लागण झाली असून एकूण २०१ जणांना त्याची लागण झाल्याचे निदान आतापर्यंत करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियाने सोमवारी वुहान येथून आलेल्या ३५ वर्षीय महिलेला विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट केले नंतर थायलंड व जपान यांनीही दोन रुग्ण सापडल्याचे कळवले होते. त्यांनी चीनच्या वुहान शहरास भेट दिली होती. वुहान येथे १७० लोकांवर उपचार सुरू असून नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे.