ट्रेनमध्ये प्रवाशांची लूटमार करणाऱ्या टोळीला विरोध केल्याने राजस्थानमधील कोटा शहरातील एका सॉफ्टवेअर इंजीनियरला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून देण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला विरोध करणाऱ्या तरुण इंजीनियरला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याने त्याला आपले दोन्ही पाय गमावावे लागले आहेत. या तरुणाला दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाला आयुष्यभराचे अपंगत्व आल्याचा आरोप या तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

दिपक शुक्ला असे या तरुणाने नाव असून तो मुळचा कोटामधील कुन्हाडी भागातील रहिवासी आहे. दिल्लीतील एका खासगी कंपनीमध्ये काम करणारा दिपक सुट्टीनिमित्त काही दिवस आपल्या घरी आला होता. दिल्लीला परत जाताना ५ सप्टेंबर रोजी हजरत निजामुद्दीन इंटरसिटी ट्रेनमध्ये दिपकबरोबर ही धक्कादायक घटना. दिल्लीला जाताना दिपक सामान्य (जनरल) डब्यामधून प्रवास करत होता. त्यादरम्यान ३ ते ४ गुडांनी त्या डब्यातील काही प्रवाशांच्या समानावर डल्ला मारला. यावेळी दिपकने पुढे येऊन त्यांना विरोध केला. वादाचे रुपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. त्या चोरांनी दिपकला बेदम मारहाण केली. त्यानंतर ओखला रेल्वे स्थानकामध्ये ट्रेन पोहचण्याआधी त्यांनी दिपकला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. दोन्ही पायांचा गुडघ्याखालील भाग गाडीच्या चाकांखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावावे लागले.

ओखला रेल्वे स्थानकामध्ये ट्रेन थांबल्यानंतर ज्या प्रवाशांसमोर दिपकला बाहेर फेकले ते प्रवासी खाली उतरले आणि घटनास्थळी गेले. त्यांनी तेथे पडलेल्या दिपकला रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दिपकचे नातेवाईक दिल्लीला पोहचले. घरातून आपल्या पायावर चालत निघालेल्या तरुण मुलाचे दोन्ही पाय तुटल्याचे पाहून त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला.

निजामुद्दीन रेल्वे स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात चार दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. दिपकने जेव्हा ट्रेनमध्ये चोरांना विरोध केला ट्रेनमधील पोलिसांनी त्याची मदत केली नाही. पोलीस दूर्लक्ष करत असल्याचे पाहून चोरांनी दिपकला ट्रेनच्या बाहेर फेकून दिल्याचे सहप्रवाशांचे म्हणणे आहे.