साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८० मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली. कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या. हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ ‘बादलोंके घेरे’, ‘बचपन’ या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. त्या एक व्याख्यात्या आणि भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला. सोबती यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमध्ये झाले. फाळणीनंतर सोबती यांनी आपल्या नवऱ्यासोबत भारतात वास्तव्य करणेच पसंत केले.

सोबती यांच्या हिंदी लिखाणात पंजाबी आणि उर्दू शब्द सर्रास यायचे. त्यांनी कादंबरीत किंवा कथांमध्ये निर्माण केलेल्या काल्पनिक पात्रांच्या तोंडी सामान्यांना समजेल अशी भाषा आहे. त्याचमुळे त्यांची पुस्तके आणि कादंबऱ्या गाजल्या. ‘मित्रो मरजानी’ ही कादंबरी त्यांनी १९६६ मध्ये लिहिली. या कादंबरीत विवाहित स्त्रीच्या लैंगिक भावनांचे चित्रण होते त्यामुळे ही कादंबरी त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती. हिंदी भाषेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या लेखिकेला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishna sobti to be honoured with jnanpith award for her contribution to hindi literature
First published on: 03-11-2017 at 18:02 IST