दिल्लीत काँग्रेसची सद्दी संपणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेत्या कृष्णा तीरथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तीरथ यांनी काँग्रेस नेतृत्वावर कडाडून हल्ला चढवला. तीरथ यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. सामान्य माणसाच्या विकासासाठी भाजपमध्ये दाखल होत असल्याची प्रतिक्रिया तीरथ यांनी व्यक्त केली. एवढय़ावर न थांबता भारताला काँग्रेसमुक्त बनवण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री असलेल्या तीरथ यांना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उदीत राज यांनी पराभूत केले होते.
सोमवारी दुपारी तीरथ यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह व केंद्रीय संघटन मंत्री रामलाल यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी तीरथ यांच्या भाजपप्रवेशाची अधिकृत घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवणाऱ्या राखी बिडलान यांच्याविरोधात तीरथ यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये अन्य पक्षातून तसेच ऐनवेळी दाखल झालेल्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. ज्यात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, आपचे आमदार विनोदकुमार बिन्नी, कृष्णा तीरथ यांचा समावेश आहे. याचा संदर्भ देत काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपकडे स्वतचे नेते-कार्यकर्ते नसल्याने त्यांना इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागत असल्याचा आरोप माकन यांनी केला. आम आदमी पक्षानेदेखील भाजपवर तोंडसुख घेतले.

बेदींना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केल्यास भाजपमध्ये बंडखोरी?
माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांचा भाजपमध्ये अचानक झालेला प्रवेश आणि आता त्यांची मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून सुरू झालेली चर्चा यावरून पक्षात बंड पुकारले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरण बेदी सध्या पक्षाच्या सर्वसाधारण सदस्या आहेत. प्रचारात पक्षाचा चेहरा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव पुढे करणे हाच उत्तम पर्याय आहे, असे मत पश्चिम दिल्ली मतदारसंघातील खासदार मनोज तिवारी यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश मुखी हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. एखाद्या उमेदवाराला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणणे किंवा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करणे याबाबतचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल, असे मुखी म्हणाले.