२०१९ च्या निवडणुका भाजपाने जिंकल्या तर देशाचा हिंदू पाकिस्तान होईल असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी दोन दिवसांपूर्वी केले. त्यावरून बराच वाद निर्माण झाला त्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. भाजपाला उत्तर देण्यासाठी शशी थरूर यांनी अमर प्रेम या सिनेमातील गाण्याचा आधार घेतला आहे. ”कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना, छोडो बेकारकी बातोमें बीत न जाए रैना” अशा ओळी लिहित #HinduPakistan असे लिहिले आहे. म्हणजेच आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता भाजपा यावरूनही हा वाद शमला असे काही म्हणता येणार नाही. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्हीकडून सुरुच राहतील असे सध्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या वेळी कशी परिस्थिती होती हे सांगत असताना गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. कारण त्यांनी काँग्रेसने सांगितलेली गाणी म्हणण्यास नकार दिला हे उदाहरण दिले होते. आता शशी थरूर यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी किशोर कुमार यांच्याच गाण्याचा आधार घेतला. कुछ तो लोग कहेंगे या गाण्याची व्हिडिओ लिंक ट्विट करत आणि किशोर कुमार यांच्या फोटोसह हे गाणे त्यांनी ट्विट केले आहे आणि आपल्यावर टीका करणाऱ्या भाजपाला उत्तर दिले आहे. तुम्ही बोलत राहा मला काही फरक पडत नाही असाच या ट्विटमागचा उद्देश आहे हे स्पष्ट होते आहे.

एवढेच नाही तर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी भाजपा आग्रही नसेल तर त्यांनी त्यांची ही भूमिका रेकॉर्डवर आणावी. काँग्रेसचा विश्वास हिंदू राष्ट्रवार नाही तर सर्वसमावेश राष्ट्रावर आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच जो काही वाद निर्माण केला जातो आहे त्या वादाचे हेच उत्तर आहे असेही थरूर यांनी म्हटले आहे.

आजच शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शशी थरूर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेने शशी थरूर आणि दिग्विजय सिंग यांचा वैचारिक सुन्ता झाल्याची टीका करत हे दोघेही नावालाच हिंदू आहेत असे म्हटले आहे. अशात शशी थरूर यांनी किशोर कुमारचे गाणे ट्विट करत भाजपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.