भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या माजी अधिकाऱ्यानेच ना’पाक’ डाव उघड केला आहे. जाधव यांना पाकमधून अटक करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. पण जाधव यांना पाकिस्तानातून नव्हे, तर इराणमधून अटक केली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे जाधव यांच्या अटकेसंदर्भात भारताने केलेला दावा खरा ठरला असून पाकचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असे बोलले जात आहे.

जाधव यांना पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातून गेल्या वर्षी ३ मार्च रोजी अटक करण्यात आल्याचा दावा तेथील अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, त्यांना इराणमधून अटक केल्याचा दावा भारताने केला होता. पाकिस्तानी लष्करातील माजी अधिकारी अमजद शोएब यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. इराणमधील चाबहारमधून जाधव यांना अटक करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. पाकच्या लष्करी न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीदरम्यान, जाधव यांना मूलभूत अधिकारही दिले नाही. याशिवाय जाधव यांना राजनैतिक मदतही देण्यात आली नाही. पाकिस्तानातील भारतीय दूतावासामार्फत संपर्क साधण्याची भारताने तब्बल १६ वेळा विनंती केली होती. पण पाकिस्तानने तीही फेटाळून लावली. भारताच्या याचिकेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी जाधव हे हेर असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना फाशी देता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते.