कुलभूषण जाधव प्रकरण

नवी दिल्ली : भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार देणारे विधेयक गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत मांडण्यात आले त्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी, असे भारताने गुरुवारी पाकिस्तानला सांगितले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निवाड्यानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेण्याची मान्यता देण्यात आली होती, मात्र त्यांना ती संधी देण्यात आली नाही त्यामागे पूर्वग्रह होता का, हे ठरविण्यासाठी स्थानिक न्यायालयाची मदत घेण्याची तरतूद विधेयकामध्ये आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते र्अंरदम बागची यांनी सांगितले.

विधेयकातील त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी, असे आवाहन पाकिस्तानला करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पाकिस्तानने पावले उचलली आहेत का हे स्थानिक न्यायालय ठरवू शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचे पालन करावे, असे आवाहन पाकिस्तानला करण्यात आले.