पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) उद्या (बुधवार) निकाल देणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागेल अशी भारताला आशा आहे.

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना आयसीजेने मे २०१७ मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. आता कोर्ट उद्या आपला निकाल देणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

या प्रकरणात पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च २०१६ मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करीत आयसीजेमध्ये खटला दाखल केला आहे.

पाकिस्तानच्या एका लष्करी कोर्टाने देशात हेरगिरी करण्यास आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांखाली एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आयसीजेने पाकिस्तानला सांगितले की, त्यांचा निकाल येईपर्यंत जाधव यांना देण्यात येणारी फाशीची शिक्षा स्थगित करावी. भारताने आयसीजेकडे जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करीत त्वरीत सुटकेची मागणी केली आहे. जाधव यांना दोषी ठरवताना आवश्यक प्रक्रियांचे पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जराही पालन केले नसल्याचा आरोपही भारताने केला आहे.