कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने शुक्रवारी अखेर नरमाईची भूमिका घेतली आहे. कुलभूषण जाधव यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली असून मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

हेरगिरी व घातपाती कारवायांच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी अटक केली होती. ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानातून त्यांना अटक करण्यात आली होती. तर भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देखील सुनावली होती. मात्र भारताने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. शेवटी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

कुलभूषण जाधव यांची भेट घेता यावी यासाठी त्यांच्या आईने आणि पत्नीने पाकिस्तानकडे अर्ज केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजिज यांना २७ एप्रिलला पत्र पाठवून जाधव कुटुंबियांना व्हिसा मंजूर करण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडेही पाकिस्तानने दुर्लक्ष केले होते.

शुक्रवारी पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. आता कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला पाकिस्तानला जाता येणार आहे.

दरम्यान, जूनमध्ये कुलभूषण जाधव यांनी हेरगिरी केल्याची कबूली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावाही पाकच्या वतीने करण्यात आला होता. मात्र त्यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. तर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काही दिवसांपूर्वीच कुलभूषण जाधव प्रकरणात मवाळ भूमिकेचे संकेत दिले होते. ‘न्यायालयातील सुनावणी लवकर संपावी, अशी आमची इच्छा आहे. जोपर्यंत जाधव यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व दया याचिकांचा अवलंब केला जात नाही, तोपर्यंत त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही’ असे पाकने म्हटले होते.