आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताला मोठे यश; राजनैतिक संपर्काची अनुमती देण्याचे पाकिस्तानला निर्देश

द हेग : कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश मिळाले. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले. भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांची बाजू ऐकून घेऊन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर दोन वर्षे आणि दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करण्याचे निर्देश पाकिस्तानला देतानाच न्यायालयाने व्हिएन्ना कराराच्या उल्लंघनाबाबतचा भारताचा मुद्दाही ग्राह्य़ धरला.

‘‘पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क ठेवण्याचा, त्यांच्या कायदेशीर लढय़ाची व्यवस्था करण्यास भारताला मज्जाव केला होता. जाधव यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी राजनैतिक संपर्क ठेवण्याच्या भारताच्या अधिकाराचे पाकिस्तानने उल्लंघन केले,’’ असा ठपका न्यायालयाने आपल्या ४२ पानी निकालपत्रात ठेवला.

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र नौदलातून निवृत्तीनंतर जाधव हे व्यापारानिमित्त इराणमध्ये असताना त्यांचे अपहरण करण्यात आले, अशी भारताची भूमिका आहे.

जाधव यांना राजनैतिक संपर्काची अनुमती देण्याची भारताची मागणी पाकिस्तानने न्यायालयात फेटाळून लावली होती. जाधव यांच्याकडून गुप्त माहिती मिळवण्यासाठी भारताला राजनैतिक संपर्क हवा आहे, असा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र २५ डिसेंबर २०१७ रोजी पाकिस्तानने जाधव यांची पत्नी आणि आई यांना इस्लामाबादमध्ये त्यांना भेटू दिले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणाच्या निर्णयापर्यंत जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश १८ मे २०१७ रोजी दिले होते.

पुढील कार्यवाही ‘कायद्या’प्रमाणेच : पाकिस्तान

कुलभूषण जाधव प्रकरणात ‘कायद्याप्रमाणे’ पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट केले. पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा जबाबदार सदस्य आहे. पाकिस्तानने या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापासूनच आपली कटिबद्धता जोपासली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताकडून स्वागत

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. हा भारताचा मोठा विजय असून, या निर्णयाने भारताच्या भूमिकेला बळकटी मिळाली आहे. कुलभूषण यांची लवकरच सुटका होऊन त्यांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाची पाकिस्तानने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली.

मित्र, नातेवाईकांमध्ये आनंद अन् भीतीही

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात येत असून, कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतील मित्रांनी पेढे वाटून, फुगे हवेत सोडत जल्लोष केला. या प्रकरणात पाकिस्तान तोंडघशी पडले असून, आता कुलभूषण यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी त्यांचे बालपणीचे मित्र अरविंद सिंग यांनी केली. न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, पाकिस्तान त्याची अंमलबजावणी करेल का, अशी भीतीही त्यांच्या अनेक मित्रांनी व्यक्त केली. ‘या प्रकरणात भारत सरकार करत असलेल्या परिश्रमाबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र, कुलभूषण यांना पाकिस्तानमधून भारतात आणले जाईपर्यंत भीती कायम राहील’’, असे कुलभूषण यांचे नातेवाईक निवृत्त एसीपी सुभाष जाधव यांनी सांगितले.

निकालाची वैशिष्टय़े

* कुलभूषण यांच्याशी राजनैतिक संपर्काच्या भारताच्या अधिकाराचे पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्याचा न्यायालयाचा ठपका

* न्यायालयाचा १५ विरुद्ध १ असा निर्णय. न्यायवृंदातील पाकिस्तानच्या सदस्याचे बहुमताच्या निर्णयाविरोधात मत

* व्हिएन्ना करारानुसार, कुलभूषण यांच्या अटकेबाबत भारताला तात्काळ माहिती देणे पाकिस्तानला बंधनकारक होते. मात्र ही माहिती देण्यात तीन आठवडय़ांचा विलंब होणे हे पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन, असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण.

पाकिस्तानला चीनचा धक्का

आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनने पाकिस्तानला धक्का दिला. कुलभूषण प्रकरणात चीनच्या न्यायाधीशांनीही भारताच्या बाजूने निर्णय दिला. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याच्या न्यायालयाच्या बहुमताच्या बाजूने चीनचे न्यायाधीश हनकीन यांनी कौल दिला. हा भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.