भारताची आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागणी

 द हेग : भारतीय नागरिक असलेले कुलभूषण जाधव यांना ‘हास्यास्पद प्रकरणाच्या’ आधारावर दोषी ठरवणारा निकाल देणाऱ्या सुनावणीत आवश्यक त्या प्रक्रियेचे किमान निकषही पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी आणि त्यांच्या तत्काळ सुटकेचा आदेश द्यावा, अशी विनंती भारताने सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली.

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेले जाधव यांच्यावरील ‘हेरगिरी आणि दहशतवादाच्या’ आरोपांची सुनावणी करून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

४८ वर्षांचे जाधव यांना राजनैतिक मार्गाने भेटीची संधी वारंवार नाकारून पाकिस्तानने व्हिएन्ना करारातील तरतुदींचे ‘घोर उल्लंघन’ केले असल्याचे सांगून भारताने त्याच वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे ४० जवानांचा बळी घेणारा दहशतवादी हल्ला केल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला असतानाच, जाधव यांच्या प्रकरणाची चार दिवसांची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या येथील मुख्यालयात सोमवारी सुरू झाली.

पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने केलेल्या सुनावणीत आवश्यक त्या प्रक्रियेचे किमान निकषही पूर्ण करण्यात आले नाहीत. त्यामुळे या न्यायालयाने केलेली सुनावणी बेकायदेशीर जाहीर करावी, असी मागणी भारत आणि जाधव यांच्यावतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केली. पाकिस्तानातील लष्करी न्यायालये स्वायत्त नसून, असा न्यायालयांच्या कामकाजावर युरोपीय संसदेने ताशेरे ओढले आहेत, याकडे भारताचे माजी सॉलिसिटर जनरल असलेल्या साळवे यांनी लक्ष वेधले.

स्थानबद्ध करण्यात आलेल्या विदेशी व्यक्तीला जीनाचा, निष्पक्ष सुनावणी होण्याचा आणि निष्पक्ष न्यायपालिकेचा हक्क असतो. तथापि, पाकिस्तानने गेल्या दोन वर्षांत लष्करी न्यायालयांतील अपारदर्शक प्रक्रियेत १६१ नागरिकांना मृत्यूदंड ठोठावला आहे. अशाच लष्करी न्यायालयाने जाधव यांची सुनावणी केलेली असल्याने त्यांना दिलासा द्यावा, असेही साळवे म्हणाले.

कुलभूषण जाधव यांचा कुठल्याही दहशतवादी कृत्यात सहभाग आहे हे दर्शवणारा काहीही ‘विश्वासार्ह पुरावा’ पाकिस्तानने पुरवला नसून; जाधव यांचा तथाकथित कबुलीजबाब हा ‘बळजबरीने’ घेण्यात आलेला असल्याचे स्पष्टपणे दिसते, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.

पाकच्या हंगामी न्यायाधीशांना हृदयविकाराचा झटका

इस्लामाबाद: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच, या न्यायालयातील पाकिस्तानसाठीचे हंगामी न्यायाधीश तसद्दुक हुसेन गिलानी (६९) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती पाकिस्तानी वृत्त वाहिनीने दिली.