News Flash

हरयाणा जनहित काँग्रेस एनडीएतून बाहेर

हरयाणा जनहित काँग्रेसचे सर्वेसर्वा कुलदीप बिश्नोई यांनी भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप करीत तीन वर्षांची आघाडी संपुष्टात आणली. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या राष्ट्रीय लोकशाही

| August 29, 2014 12:19 pm

हरयाणा जनहित काँग्रेसचे सर्वेसर्वा कुलदीप बिश्नोई यांनी भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप करीत तीन वर्षांची आघाडी संपुष्टात आणली. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पहिली फूट पडली आहे. भाजपने बिश्नोई यांचे वर्णन सैन्याशिवायचा सेनापती असे करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र असलेले बिश्नोई आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी काँग्रेस नेते विनोद शर्मा यांच्या जन चेतना पक्षाशी आघाडी करणार आहेत. शर्मा यांनी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून बिश्नोई यांच्या नावाला संमती दिली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजप-हरयाणा जनहित काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला. अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांचा सन्मान जो पक्ष ठेवू शकत नाही त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, अशा शब्दांत बिश्नोई यांनी भाजपवर तोफ डागली.
‘ही काँग्रेसचीच आवृत्ती’
भाजपने बिश्नोई यांच्या आरोपांना उत्तर देत, त्यांचा पक्ष काँग्रेसचीच छोटी आवृत्ती असल्याचा टोला प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी लगावला. त्यांच्या पक्षाचे सर्व सहा आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्या इशाऱ्यावर बिश्नोई राजकारण करत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. भाजप  विधानसभा स्वबळावर निवडणूक लढेल असे त्यांनी स्पष्ट केले.

वादाचे कारण
जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू होता. बिश्नोई यांनी विधानसभेच्या ९० पैकी ४५ जागा मागितल्या होत्या. तसेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करावे अशी मागणी केली होती. भाजपने या दोन्ही मागण्या धुडकावल्या होत्या. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यातील दहापैकी सात जागा भाजपने जिंकल्या, तर बिश्नोई यांचा पक्ष लढवलेल्या दोन्ही जागी पराभूत झाला होता. त्यामुळे धुसफूस सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 12:19 pm

Web Title: kuldeep bishnoi led haryana janhit congress snaps ties with bjp
टॅग : Bjp
Next Stories
1 रेल्वेमंत्र्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप
2 आगामी शैक्षणिक वर्षांपासून पाच नव्या आयआयटी
3 किमान निवृत्तिवेतनाची मर्यादा १००० रुपये
Just Now!
X