काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस कार्य समितीचे विशेष आमंत्रित सदस्य असणाऱ्या कुलदीप बिश्नोई यांनी सोमवारी या टीकेला उत्तर दिलं आहे. राज्यसभेचे खासदार असणारे आझाद यांचा स्वत:च्या पक्षाच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या मदतीने काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचे बिश्नोई म्हणाले आहेत. आझाद यांनी गांधी कुटुंबाबरोबर गद्दारी केल्याचा आरोपही बिश्नोई यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत असा विश्वासही बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे.

हरयाणा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते असणाऱ्या बिश्नोई यांनी ट्विटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “आझाद साहेब यांनी केलेलं वक्तव्य ऐकलं आणि मी थक्क झालो आहे. खूप दुख: झालं आणि रागही आला. एवढा वरिष्ठ नेत्याने अशापद्धतीने सार्वजनिक प्रकारे असं वक्तव्य करणं आश्चर्यकारक आहे. याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे,” असं बिश्नोई या व्हिडीओ म्हणताना दिसतात. “आझाद साहेबांच्या सांगण्यानुसार पक्षामध्ये खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत निवडणूक झाली पाहिजे. मी त्यांना विचारु इच्छितो की जेव्हा त्यांना जम्मू-काश्मीर युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी निवडणुकांबद्दल भूमिका का घेतली नव्हती? जेव्हा त्यांना भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं तेव्हा त्यांनी निवडणुकींबद्दलची इच्छा का बोलून दाखवली नाही?,” असे प्रश्न बिश्नोई यांनी विचारले आहेत.

पुढे बोलताना बिश्नोई यांनी, “आझाद साहेब तुम्ही विरोधी पक्षांच्या मदतीने आज केवळ पक्ष तोडण्याचा डाव आखत आहात. आम्ही तुमचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही” असा इशाराही दिला. त्याचप्रमाणे “तुमचा इतिहास काय आहे? संपूर्ण आयुष्यात तुम्ही केवळ तीन निवडणुका लढवल्या आहेत. ज्या गांधी कुटुंबाने तुम्हाला पाच वेळा राज्यसभेवर पाठवलं आज तुम्ही त्यांच्याविरोधात बोलत आहात. तुमच्यापेक्षा जास्त निवडणुका मी जिंकलो आहे. मी सहा निवडणुका जिंकलोय,” असंही बिश्नोई यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.

“जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही आणि तुम्ही इथे सल्ले देत आहात. तुम्हाला हरयाणा विधानसभा निवडणुकींचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं होता. तुम्ही पक्षाची वाट लावली. तुमच्या जागी इतर कोणी प्रभारी असतं तर आज हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार असते,” असंही माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे पुत्र असणाऱ्या बिश्नोई यांनी म्हटलं आहे.  “तुम्ही गांधी कुटुंबाविरोधात गद्दारी करत आहात. इंदिराजी आणि राजीवजींनी देशासाठी प्राण दिले आहेत. सोनियांनी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी अध्यक्ष पद स्वीकारले आहेत. आज राहुल गांधी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये दौरे करत आहेत. प्रियंका गांधीही पक्षाला बळकटी देण्यासाठी लढत आहेत,” असं म्हणत बिश्नोई यांनी गांधी कुटुंबाचे कौतुक केलं.

बिश्नोई यांनी पुढे बोलताना, “आम्ही गांधी कुटुंबासोबत आहोत. राहुल आणि प्रियंका गांधी आहेत म्हणून आज काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मेहनत करण्यावर भर द्यावा. आपण पुन्हा एकदा काँग्रेससाठी चांगेल दिवस नक्कीच आणू,” असं म्हटलं आहे.