थंडीपासून वाचवण्यासाठी घरामध्ये कोळश्याची शेगडी पेटवून झोपलेल्या दोन तरुणांचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना हिमाचलमध्ये घडली आहे. येथील कुल्लू जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. रात्री जास्त थंडी असल्याने दोन तरुणांनी कोळश्याची शेगडी पेटती ठेऊनच झोपण्याचा निर्णय घेतला. मात्र रात्री याच शेगडीमुळे झालेल्या धुरात गुदमरुन दोघांचाही जळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार कुल्लू जिल्ह्यातील लोअर ढालपूर येथेली विपाशा गेस्ट हाऊसमध्ये हा सर्व प्रकार घडला. येथील गेस्ट हाऊसमध्ये दोन जणांचा जळून मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक आणि पोलीस स्थानकाचे प्रमुख अधिकारी आपल्या टीमसहीत घटनास्थळी पोहचले. त्यांनी जागेचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मरण पावलेल्या व्यक्तींची नाव ताराचंद आणि अजय कुमार असं असल्याची माहिती समोर आली आहे. ३४ वर्षीय ताराचंद हे मूळचे चांमुंडा नगर येथील रहिवाशी होते तर अजय कुमार हा अवघ्या २० वर्षांचा होता. अजय हा लोअर ढालपूर येथे रहायचा.

यासंदर्भात न्यूज १८ शी बोलताना पोलिस उपअधीक्षक प्रियांका गुप्ता यांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्याचं सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा लोअर ढालपूर विपाशा गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक १०१ मध्ये दोन व्यक्तींचे मृतदेह पडलेले होते. पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली तर खोलीमध्ये कोळश्याची शेगडी सापडली. दोघांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे हल्ल्याचे निशाण नव्हते. दोन्ही व्यक्तींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी ते त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास कोणत्या मार्गाने करायचा याचा निर्णय पोलीस घेतील.

पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी, “खोलीमध्ये कोळश्याची शेगडी जळत होती. याच शेगडीमुळे खोलीत झालेल्या धुरात गुदमरुन दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे,” असं सांगितलं. तसेच मरण पावलेल्या दोन्ही व्यक्ती या स्थानिक असून पोलीस पुढील तपास करत असल्याचेही सिंह म्हणाले.