काल संध्याकाळी सातच्या सुमारास केतकर सरांना राज्यसभा घोषित झाल्याची बातमी मिळाली आणि आश्चर्याचा झणझणीत धक्का बसला… म्हणजे, गोड वगैरे ठीकाय, पण झणझणीत जास्त होता. कारण ती एक संधी केतकर सरांच्या आयुष्यातून कायमची गेली म्हणून उसासे सोडणाऱ्या आणि त्याबद्दल काँग्रेसला दूषणं देणाऱ्या काही केतकर-काँग्रेस-प्रेमींपैकी मी आहे, हे सांगायला मला काहीच संकोच नाही. त्यात आता एकच उमेदवार पाठवता येणार आहे, हा अजून एक नाजूक विषय. त्यात त्यांचं नाव येईल, हे ध्यानी,मनी, स्वप्नी वगैरेसुद्धा नव्हतं. मात्र त्यांच्या निवडीतून काय काय संदेश जातायत, हे समजून घेणं गरजेचं आहे… आणि हा संदेश समजायचा तर कुमार केतकर आणि त्यांची राजकीय बैठक समजून घेणं, हेही तेव्हढंच महत्त्वाचं आहे.

सरांच्या राजकीय बैठकीचा पाया हा निःसंशय मार्क्सवादी आहे. यात मार्क्स कधीच चुकू शकत नाही, आणि त्याच्या वर्गसंघर्षाच्याच लढ्याला अजूनही लढत राहिला पाहिजे, हा भाबडा राजकीय साम्यवाद नाही. मार्क्सने सामजिक-राजकीय घटनांच्या विश्लेषणासाठी जो ‘दृष्टीकोन’ दिला, तो महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे आणि नव्या नव्या संदर्भात तो ताडून पाहिला पाहिजे, हा त्यांच्या मार्क्सवादाचा अर्थ आहे आणि त्याबद्दल ते (नेहमीप्रमाणे) कट्टर आहेत! दुसरा पदर हा भारतीय राजकारणाच्या (त्यांच्याच भाषेत) ‘महत्तम सामायिक विभाजाका’चा आहे. ‘एव्हढ्या मोठ्या, अफाट लोकसंख्येच्या, अचाट वैविध्यपूर्ण देशात सतत आणि वादातीत ‘न्याय’ करणं अशक्य आहे, किंबहुना तो प्रयत्न उलट अधिक अन्यायाला जन्म देऊ शकतो. तेव्हा सतत जास्तीत जास्त लोकांचं भलं करून त्यांना संधी उपलब्ध करून देत राहायला हवं, या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांकडून अन्याय हा होणारच आणि तो अपरिहार्य आहे, पण तरच दीर्घकालात (Long Term) आपण अधिक चांगल्या समाजाकडे जाऊ शकतो.’ हा त्यांचा दुसरा विश्वास आहे. याबरोबरच त्यांच्या विचारधारेतली, फारशी ज्ञात नसलेली तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा ‘तंत्रज्ञान’वाद. उत्तमोत्तम तंत्रज्ञान हे त्यांना निव्वळ वापरण्यासाठी नाही तर एक मानवी प्रतिभेचं अद्भुत कर्तृत्व म्हणून त्यांना ‘Fascinating’ वाटतं आणि ते आपल्यापर्यंत घेऊन येणारे शास्त्रज्ञ त्यांना खूपच आदराचे धनी वाटतात. तंत्रज्ञान, डावी विचारसरणी आणि कल्याणकारी धोरणांची लवचिकता, हा त्यांच्या राजकीय मांडणीचा सारांश आहे आणि कॉंग्रेसने त्यांच्या रुपात ही मांडणी मान्य केलेली आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवं.

एखाद्या कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या अढळ निष्ठेने त्यांनी ही राजकीय विचारसरणी गेली अनेक दशकं बाळगलेलीच नव्हे तर त्यासाठी अविरत प्रयत्न केलेले आहेत. ह्या मांडणीच्या इतर अनेक पक्ष जवळपासही जाऊ शकत नाहीत. कॉंग्रेसमध्ये अनेक दोष असतील पण सातत्याने या मांडणीच्या बाजूने असलेला एकमेव पक्ष कॉंग्रेस आहे, त्यामुळे इच्छा असो वा नसो, त्या पक्षाला पाठींबा देणं ही राजकीय गरज आहे, ही त्यांची भूमिका कायम आहे. दुर्दैवाने आकलनाची झेप मर्यादित असलेले अनेक जण याला ‘काँग्रेसचं/गांधी घराण्याचं लांगुलचालन’ समजतात. केतकर एकदा टिळकांवर बोलताना म्हणाले तसं, ‘टिळक हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे, काँग्रेस/गांधी घराणं नव्हे! ती माझी राजकीय भूमिका आहे’. पण हे बहुतेकांना समजत नाही. त्यांनी वेळोवेळी केलेलं काँग्रेसचं आक्रमक समर्थन, हेही त्याला कारणीभूत आहेच, पण ते त्यांना ठावूक आहे आणि बरीच व्यक्तिगत किंमत देऊनही त्याची त्यांना फिकीर नाही. किंबहुना खाजगीतच नव्हे तर काँग्रेसच्या अंतर्गत व्यासपीठावर जाहीररीत्या त्यांनी काँग्रेसच्या अनाकलनीय सुस्तपणाचे वाभाडे काढलेले आहेत आणि खासदारकीची ही संधी त्यांना एक दशकापूर्वी न मिळायला हीच गोष्ट कारण होती, अशीही चर्चा होते.

काँग्रेसने केलेली त्यांची निवड याच पार्श्वभूमीवर फारच महत्त्वाची आहे. सत्ता नसताना, आर्थिक आणि राजकीय स्थिती खूपच नाजूक असताना, एखादा उद्योगपती अथवा काहीशे कोटी फेकू शकणारा मातब्बर ‘सरदार’ राज्यसभेवर पाठवणं हा पक्षाला एक सोपा पर्याय होता, किंबहुना याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती असून भाजपा विधानपरिषदेवरसुद्धा कोणाला संधी देते ते दिसतंच आहे. काँग्रेसने हे न करून कदाचित डावपेचात्मक चूक केलेली आहे, असंही कोणी म्हणेल. पण त्यात काँग्रेसने काही संदेश दिलेले आहेत. एक म्हणजे अधिवेशनं गदारोळात फुकट जात असली, तरी काँग्रेसला आपली भूमिका उत्तमपणे मांडू शकणारा वक्ता मोलाचा वाटतो आहे. दुसरं म्हणजे केतकर सरांची पित्रोदांशी जवळीक लक्षात घेता आपल्या या दूरदेशीच्या ‘गुरु’चा प्रभाव राहुल गांधीवर स्पष्टपाने आहे. तिसरा मुद्दा हा की ठोक लांगुलचालनाच्या पलीकडे जाऊन विद्वत्तेला स्वीकारायची तयारी पक्ष दाखवत आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण यामुळे आपली स्वीकारार्हता वाढवणं पक्षाला शक्य होईल. चौथं म्हणजे एकूणच पक्षाची जी पुनर्मांडणी नव्या नेतृत्त्वाखाली होते आहे, त्याचा केतकर सरांची निवड हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण वयाने मोठे असले तरी काँग्रेसच्या तरुण आणि आधुनिक समर्थकांत त्यांचं जाळ फार घट्ट आहे!

काँग्रेस आणि केतकर, या दोघांसाठी ही निवड एका नव्या काळाचा उदय आहेत. खुलेआम काँग्रेसच्या झेंड्याखाली जाऊन केतकर सर तो झेंडा आता कुठवर नेतात, ते पाहाणं फारच महत्त्वाचं असेल….!

– अजित जोशी

 

(लेखक हे सनदी लेखापाल असून लेखातील त्यांचे मत वैयक्तिक आहेत.)