मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण चर्चेत राहिलं. या भाषणात त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीत राफेल करार, महिला अत्याचार, जमावाकडून होणारी मारहाण आणि हत्या या आणि अशा इतर मुद्द्यांवर मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले. भाषणानंतर राहुल यांनी अनपेक्षितपणे जाऊन पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली. पण, या गळाभेटीपेक्षा विशेष प्रकाशझोतात असणारी गोष्ट ठरली ती म्हणजे गळाभेटीनंतर राहुल गांधी यांनी मोठ्या मिश्किलपणे हसत ज्या प्रकारे बाजूला बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाहून डोळा मारला ती होय. याबाबत सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. काहींकडून राहुल गांधींची खिल्ली उडवली जातेय तर काहींनी त्यांचं समर्थन केलंय.

सोशल मीडियाप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार कुमार विश्वास यांनी राहुल यांचं समर्थन केलंय. मोदींचं नाव न घेता मन मोठं करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. डोळाच तर मारलाय नाहीतर या सभागृहात कायकाय मारण्यात आलं आहे हे देशाला माहितीये असं ट्विट कुमार विश्वास यांनी केलं आहे.