काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे करोनामुळे निधन झालं. त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक नेत्यांनी पटेल यांच्याविषयीच्या आठवणींनाही उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. प्रसिद्ध कवी आणि पूर्वाश्रमीचे आपचे नेते कुमार विश्वास यांनीही अहमद पटेल यांचा अहमद भाई असा उल्लेख करत आठवण सांगितली आहे.

केंद्रात काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार असताना भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची लाट उसळली होती. देशभरातील नागरिक रस्त्यात उतरले होते. या आंदोलनात अण्णा हजारे यांच्यासह अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास व इतरही नेते अग्रभागी होते. या आंदोलना वेळीचा किस्सा डॉ. कुमार विश्वास यांनी ट्विट करून सांगितला आहे.

“आंदोलनाच्या वेळी जेव्हा सर्व काँग्रेसचे नेते चर्चेसाठी आम्हाला अस्पृश्य समजत होते, तेव्हा अहमद भाईच होते. ज्यांनी आमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींपासून ते प्रत्येक राजकीय विचारांच्या छोट्या मोठ्या माणसासाठी ते ‘अहमद भाई’ होते. काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेचा शेवटच्या निष्ठावान ध्वजवाहकाचं जाणं अत्यंत वेदनादायी आहे. त्यांना शेवटचा सलाम,” अशा भावना व्यक्त करत कुमार विश्वास यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आणखी वाचा- काँग्रेसचा असा चाणक्य ज्याच्या सल्ल्याशिवाय हलायचं नाही पान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनाने पक्षाचा स्तंभ कोसळल्याची भावना काँग्रेसमधून व्यक्त होत आहे. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेल्या अहमद पटेल यांचं काँग्रेसमधील स्थान मोठं होतं. ते पडद्यामागे राहून काँग्रेस पक्ष संघटनेचं काम करायचे. पंचायत समिती सभापतीपदापासून सुरू झालेला अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास काँग्रेसचे संकट मोचक आणि काँग्रेसचे चाणक्य पदापर्यंत पोहोचला. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते लोकसभेत दाखल झालेल्या पटेल यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही. गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढ्यासोबत पटेल यांनी जवळून काम केलं.