हिंदी दिवस साजरा करणे हा दक्षिणेतील लोकांवर हिंदी लादण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. त्यामुळे आम्हाला हिंदी दिनात स्वारस्य नाही अशी टीका जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी केली आहे. त्यांनी हिंदी दिवस रद्द करण्याचे आवाहनही केले.

हिंदी दिवसानिमित्त ट्विट संदेशात त्यांनी म्हटले आहे की, आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका, कन्नड भाषक लोक समंजस आहेत, हा त्यांचा कमकुवतपणा समजू नका. भारत हा विविध भाषा, संस्कृती व परंपरांचा देश आहे. कन्नडसह दाक्षिणात्य भाषा बोलणाऱ्यांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदी दिन साजरा करण्यामागे तोच हेतू आहे. कन्नडिगांचा हिंदी दिनाला विरोध आहे. कारण तो भाषिक मुजोरीचा प्रकार आहे. हिंदूी ही आपली राष्ट्रभाषा नाही. राज्यघटनेत अशी संकल्पनाच नाही. तरी हिंदी ही राष्ट्रीय भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न केला जातो त्यावर राजकारण केले जाते. आता हे प्रकार टोकाला गेले आहेत. आम्ही आंदोलनाचे शस्त्र उचलण्याआधीच हिंदी भाषा लादणे बंद करा, शिक्षणाच्या नावाखाली हिंदी  लादण्याचा डाव आहे. कुठलेही शिक्षण कुठल्या गोष्टी लादून होत नसते. भाषा लादताना दुसरी भाषा मरण्याचा धोका असतो. त्यातून सांस्कृतिक विविधता धोक्यात येते. १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या दिवशी हिंदीची केंद्रात अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरणाऱ्या बिओहार राजेंद्र सिंह यांची जयंती असते. हिंदी दिनात आमच्यासाठी तरी साजरे करण्यासारखे काही नाही. हा हिंदी दिवस बंद करा. जर हिंदी दिवस साजरा करायचा असेल तर इतर भाषांचे दिवसही साजरे करा.