कर्नाटकमधील सत्तानाटय़ संपुष्टात; भाजपचा आज सत्तास्थापनेचा दावा?

कर्नाटकमधील सत्तानाटय़ अखेर तीन आठवडय़ांनी मंगळवारी संपुष्टात आले. काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर अनेक दिवस लांबलेल्या शक्तिपरीक्षेत एच. डी. कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९, तर विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले असून, भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आघाडीतील १६ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी सरकार अडचणीत आले होते. सरकार वाचविण्यासाठी आघाडीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईत तळ ठोकलेल्या १३ बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सत्ताधाऱ्यांनी केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. अखेर कुमारस्वामी यांनी गेल्या गुरुवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, राज्यपाल वजुभाई वाला यांनी ठरावावरील मतदानासाठी दिलेल्या दोन मुदती सत्ताधाऱ्यांना पाळता आल्या नाहीत.

अखेर विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी मंगळवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले. ‘काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीला ९९ मते मिळाली, तर विरोधी पारडय़ात १०५ मते पडली. कुमारस्वामी सरकार विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात अपयशी ठरले आहे,’ अशी घोषणा रमेशकुमार यांनी केली.

विश्वासदर्शक ठरावाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमधील संघर्ष वाढू लागल्याने बेंगळूरुमध्ये ४८ तासांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले. विधानसभेत सोमवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणे अपेक्षित होते. मात्र, आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होईपर्यंत मतदान घेता येणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. भाजपने मात्र सोमवारीच ठरावावर मतदान घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे विधानसभेत सोमवारी मध्यरात्रीपर्यंत गोंधळ सुरू होता. अखेर पुढील कामकाज मंगळवारी होणार असल्याचे जाहीर झाले. त्यानुसार सकाळी १० वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाले.

विश्वासदर्शक ठरावावर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाषण केले. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी ठरावावरील मतदानासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत निश्चित केली होती. तीही पाळता आली नाही. मात्र, रात्री ७.४५ च्या सुमारास ठरावावर मतदान झाले. त्यात कुमारस्वामी यांना पराभव स्वीकारावा लागला.

१४ महिन्यांत कुमारस्वामी पायउतार

कर्नाटकमध्ये मे २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या. मात्र, भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसने (अनुक्रमे ७८ आणि ३७ जागा) सत्ता स्थापन केली. मात्र, सत्तास्थापनेनंतर १४ महिन्यांतच कुमारस्वामी यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. विश्वासदर्शक ठरावावरील भाषणात कुमारस्वामी यांनी पदत्याग करण्यास तयार असल्याचे सांगत शक्तिपरीक्षेत अपयशाचे संकेत दिले होते.

क्रूर राजकीय घोडेबाजार : काँग्रेस</strong>

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपने क्रूर राजकीय घोडेबाजार केला, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी केली. केंद्र सरकार, राज्यपाल, महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेतृत्व यांच्या संगनमताने कर्नाटकमधील सरकार पाडण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

बसप आमदाराची हकालपट्टी

बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार एन. महेश यांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश धुडकावल्याने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षप्रमुख मायावती यांनी घेतला. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी गैरहजर राहणार असल्याचे महेश यांनी रविवारी जाहीर केल्यानंतर मायावती यांनी त्यांना कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो धुडकावत महेश हे मतदानावेळी गैरहजर राहिले.

लोकशाहीचा विजय : येडीयुरप्पा

‘आमदारांच्या विश्वासघातामुळे पराभव’ : काँग्रेसच्या आमदारांनी विश्वासघात केल्याने पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते एच. के. पाटील यांनी दिली. कर्नाटकची जनता हा विश्वासघात खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील जनता कुमारस्वामी सरकारला कंटाळली होती. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला असून, लोकशाहीचा विजय झाला आहे. भाजपद्वारे कर्नाटकमध्ये नवे विकासपर्व सुरू होत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले.