कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर होणारा संधिसाधू राजकारण्याचा आरोप फेटाळून लावला आहे. सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्याने मला निश्चित आनंद झालेला नाही. मला अशा पद्धतीने मुख्यमंत्री बनायचे नव्हते असे कुमारस्वामी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सध्याच्या कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीने मला आनंद झालेला नाही. मी लोकांना भरपूर आश्वासने दिली आहेत. मला बहुमताने मुख्यमंत्री बनायचे होते पण लोकांना माझ्यावर आणि माझ्या पक्षावर तितका विश्वास नाही. मी संधिसाधू राजकारणी असल्याचा माझ्यावर आरोप होत आहे त्याची मला कल्पना आहे असे कुमारस्वामी म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्री बनू शकणार नाही असा सिद्धरामय्या यांचा दावा होता ? त्या प्रश्नावर कुमारस्वामी म्हणाले कि, मला अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद नको होते. पण ते आता महत्वाचे नाही. सध्याच्या घडीला सरकार स्थापन करुन ते प्रभावीपणे चालवणे महत्वाचे आहे. सिद्धरामय्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. निवडणुकीच्या आधी ते जे काही बोलले तो भूतकाळ आहे मी भविष्याकडे पाहतो आहे असे कुमारस्वामींनी सांगितले.
कर्नाटकात येत्या बुधवारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन होणार असून कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळालेले नाही. भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते बीएस येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण बहुमताअभावी ते औट घटकेचे मुख्यमंत्री ठरले. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेस आणि जेडीएसकडे एकत्रित मिळून ११६ आमदार आहे. काँग्रेसचे ७८ आमदार निवडून आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 21, 2018 10:36 am