जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज केवळ दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होईल त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी त्याचबरोबर देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

कर्नाटकच्या विधानभवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान काही काळ पावसाला सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, बसपा सुप्रीमो मायावती, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, सीपीएमचे नेते सिताराम येचुरी, जनता दल युनायटेडचे शरद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. केंद्रात विरोधी पक्षात असलेले हे सर्व नेते यानिमित्त एकत्र आले होते. त्यामुळे आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे सर्व दिग्गज नेते एकत्र असतील असे भाकित राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

कर्नाटकमधील एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह १२ खाती जेडीएसला देण्यात येणार आहेत. तसेच २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल, असे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले होते.

जेडीएसने निवडणुकीपूर्वी बसपाशी तर निवडणुकीनंतर काँग्रेससोबत युती केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ७८ तर जेडीएसला ३८ जागांवर विजय मिळाला. तर भाजपा १०४ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. तसेच २ जागा अपक्षांना मिळाल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. दरम्यान, काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत सरकार स्थापनेसाठी पाठींबा देऊन भाजपाला धोबीपछाड दिली.