कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. येडियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस-जेडीएस आणि बसपाच्या एकूण ११७ आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. भाजपाचे सरकार अडीच दिवसात कोळसल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. बुधवारी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

कर्नाटक विधानसभेत १०४ आमदारांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. पण बहुमतांसाठी आवश्यक ११२ आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यामुळे येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ आमदार आहेत.

दरम्यान बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बहुमत चाचणी होण्यापुर्वी झालेली ही निवड जेडीएस-काँग्रेससाठी मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे.

कुमारस्वामी यांच्यासाठी बहुमत चाचणी अत्यंत महत्वाची आहे. याआधी त्यांनी ११७ आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. यासोबतच जेडीएस आणि काँग्रेसमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलं होतं. दरम्यान बहुमत चाचणीआधी काँग्रेसच्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. जेडीएसला पाच वर्ष समर्थन देण्यासंबंधी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.