News Flash

Kumbh Mela : करोनामुळे यंदाचा कुंभमेळा ३० दिवसांचाच; तारीख ठरली!

यंदाच्या वर्षी हरिद्वारमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित झाल्या असून यावेळी कुंभमेळा २ महिन्यांऐवजी एकच महिन्याचा होणार आहे.

कुंभमेळा यंदा एप्रिल महिन्यात (प्रातिनिधिक छायाचित्र)

देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यंदाचा कुंभमेळा कधी होईल? होईल की नाही? किती काळासाठी होईल? यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. नोव्हेंबर २०२०मध्ये उत्तराखंड सरकारने यंदाचा कुंभमेळा दोन महिन्यांऐवजी ४८ दिवसांचाच होईल, असं सूचित केलं होतं. आता उत्तराखंड सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला असून हरिद्वार येथे होणारा यंदाचा कुंभमेळा करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या ३० दिवसांचाच होणार आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान हरिद्वारमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी यंसंदर्भातली माहिती दिली असून मार्च महिना अखेरपर्यंत तारखांची घोषणा केली जाणार आहे.

दर १२ वर्षांनी कुंभमेळा होत असतो. एरवी कुंभमेळा किमान २ महिन्यांच्या कालावधीसाठी भरवला जातो. मात्र, यंदा करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार करोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भिती लक्षात घेता कालावधी फक्त ३० दिवसांचाच ठेवण्याच आल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी दिली आहे. यासंदर्भात मार्च महिना अखेरीपर्यंत संबंधित यंत्रणांना आदेश दिले जाणार आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने करोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.

कुंभमेळ्यासाठी काय आहेत सूचना?

१. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ७२ तास आधी करोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार
२. कुंभमेळ्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पास दिले जातील. ते मिळवण्यासाठी तुमचे ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे
३. महाकुंभमेळा २०२१च्या वेबसाईटवर प्रत्येक भक्ताने नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणी झालेल्या भाविकांनाच कुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल
४. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा परिसरामध्ये सामुहिक भजन किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे
५. पवित्र स्नानाच्या दिवशीच कुंभमेळा परिसरातील दुकानांना उघडण्याची परवानगी असेल. त्यातही औषधे, अन्न, दूध, पूजा साहित्य आणि ब्लँकेट्स अशा वस्तूंची किंवा पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांनाच परवानगी देण्यात येईल
६. पवित्र स्नानासाठी प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त २० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. या परिसरात तैनात असलेल्या व्यक्तींना PPE किट दिले जातील
७. कुंभमेळा परिसरामध्ये तैनात करण्यात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ७० हजार करोना व्हॅक्सिनचे डोस मिळावेत, अशी मागणी स्थानिक जिल्हा प्रशासनाने केली आहे
८. ६५ वर्षांवरील वृद्ध, मुले आणि गर्भवती महिलांनी यंदाच्या वर्षी कुंभमेळ्यास येऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे
याआधी १२ वर्षांपूर्वी म्हणजे २०१०मध्ये हरिद्वारमध्ये कुंभमेळा झाला होता. या मेळ्याला तब्बल ७० लाखांहून जास्त भाविकांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच पवित्र स्नानासाठीच्या घाटांवर दीड कोटींहून जास्त भाविकांनी उपस्थिती लावल्याचे देखील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे, यंदाच्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने भाविक जमा होऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 2:16 pm

Web Title: kumbh mela 2021 dates to be announced from 1st april to 30th april by uttarakhand govt pmw 88
टॅग : Kumbh Mela
Next Stories
1 जीम कॉर्बेटमधील खासगीकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
2 …आणि थोडक्यात टळलं भारत-चीन युद्ध, लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी यांचा मोठा खुलासा
3 भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन वयाच्या ८८ व्या वर्षी भाजपात करणार प्रवेश
Just Now!
X