X

“…हेच दुसरं कुणी केलं असतं, तर हिंदूद्रोही ठरवलं असतं”

काँग्रेस नेत्याचा टोला

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. करोना संक्रमणाचा वेग प्रचंड वाढला असून, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यामुळे मोठा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. मोदींनी आवाहन केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानं समाधान व्यक्त करत टोला लगावला आहे.

कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव झाला असून, मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहे. अनेक साधू आणि भाविकांना संसर्ग झाला असून, काही आखाड्यांनी कुंभमेळ्यातून परतीची घोषणाही केली. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करून समाप्त करण्याचं आवाहन केलं. या आवाहनानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुमप यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे.

“बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. दुसरं कुणी केलं असतं, तर त्याला हिंदूद्रोही ठरवलं असतं. कालपर्यंत ४९ लाख लोकांनी स्नान केलं आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा किती करोना कुठपर्यंत घेऊन जाईल, माहिती नाही,” असं म्हणत ‘कुंभमेळा तत्काळ समाप्त करायला हवा’ असं आवाहन निरुमप यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांना केलं आहे.

काय म्हणाले मोदी?

“आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि करोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल,” असं आवाहन मोदींनी केलं.

23
READ IN APP
X