उत्तराखंडमध्ये एप्रिल महिन्यात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. करोनामुळे यंदाचा कुंभमेळा हा  महिन्याभरासाठी भरवण्यात आला होता. त्यानंतर कुंभमेळ्याच्या एप्रिल महिन्यामध्ये उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली आहे. १ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये उत्तराखंडच्या रुग्णसंख्यमध्ये तब्बल १ लाख ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कुंभमेळ्याला उपस्थित राहिलेल्या भाविकांकडून ही करोनाचा प्रसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुंभमेळ्याला भेट दिलेल्या एका करोनाबाधित महिलेमुळे बंगळुरुमध्ये आणखी ३३ जणांना करोनाची लागण झाली आहे. ६७ वर्षीय या महिलेने उत्तराखंड येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतला होता. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. पश्चिम बंगळुरुमधील स्पंदना हेल्थकेअर आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमधील १३ रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे. उपचारानंतर सर्व जण बरे झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कुंभमेळ्यावरुन परतल्यानंतर महिलेने कोविड चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिच्या पतीची आणि सुनेची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. स्पंदाना हेल्थकेअरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या वृद्ध महिलेच्या सूनेला देखील करोनाची लागण झाली होती. सूनेची चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नसल्याचे तिने सांगितले.

यानंतर बीबीएमपी येथील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्यास सुरूवात केली. स्पंदना हॉस्पिटलमधील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील १३ रुग्णांसह २ कर्मचारी हे पॉझिटिव्ह निघाले. तसेच कुंभमेळ्याहून परतलेल्या कुटुंबातील १८ जणांना करोनाची लागण झाली होती. यानंतर महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान सर्वांवर उपचार करण्यात येत असून काही जण बरे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

स्पंदाना रुग्णालयातील १५ जण करोनाबाधित आढळल्याने रुग्णालयाचा एक मजला बंद करावा लागला आणि त्याला कोविड केअर वॉर्ड घोषित करावे लागले अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश आर गौडा यांनी दिली. रुग्णालयातच करोनाबाधितांवर उपचार केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

देशात करोनाच्या दुसरी लाट आलेली असताना देखील उत्तराखंडच्या हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुमारे ७० लाख लोकांनी या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता. उत्तराखंड उच्च न्यायालयाने करोनाकाळात कुंभ मेळ्याचे आयोजन केल्याने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते.