कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगो एअरलाइन्स विमानात गैरवर्तवणूक केल्याबद्दल सहा महिन्यांची बंदी घातली आहे. इंडिगोबरोबरच एअर इंडिया, स्पाइस जेट आणि गो एअर या विमान कंपन्यांनाही कुणालवर बंदी टाकली आहे. मात्र कुणालवर केलेल्या कारवाईचा फटका केवळ त्याचा बसला आहे असं नाही. एअर इंडियाच्या गोंधळामुळे नाम साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या एका कुणाल कामराचेच तिकीट कंपनीने रद्द केलं आहे.

झालं असं की कुणाल कामरा नावाच्या एका तरुणाना कॉमेडियन कुणालवरील बंदीचा फटका बसला. हा कुणाल अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहतो. तो आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतामध्ये आला होता. मात्र आपल्या काही दिवसांच्या भारत भेटीनंतर परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी विमानतळावर गेला असता कुणालला अडवण्यात आलं. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार केवळ बंदी घालण्यात आलेल्या नाम साधर्म्य असल्याने कुणालला बराच वेळ वाद घाल्यानंतर विमातळावर प्रेवश मिळाला.

कुणालने दिलेल्या माहितीनुसार तो विमानतळावर चेक-इन करण्यासाठी गेला त्यावेळी तुमचे तिकीट रद्द करण्यात आलं आहे असं त्याला सांगण्यात आलं. “माझं तिकीट रद्द केल्याचं मला सांगण्यात आलं त्यावेळी मी कारण विचारले असता माझं नाव कंपनीने काळ्या यादीत टाकल्याची माहिती मला देण्यात आली. पण एअर इंडियाने असं का केलं मला कळत नव्हतं. अखेर काही वेळाने मला कॉमेडियन कुणाल कामाराचे नाव काळ्या यादीत असल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे समजले,” असं कुणालने सांगितलं.

“कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मला पूर्णपणे मदत केली. मात्र मी वेळेआधीच पोहचल्याने मला पर्यायी व्यवस्था करता आली. असं असलं तरी तो मी नव्हेच हे सिद्ध करण्यासाठी मलाच धडपड करावी लागली याचं वाईट मला वाटलं,” असंही कुणालने या अनुभवाबद्दल सांगितलं.

“विमानतळावर पोहचल्यावर मला माझे तिकीट रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र असं का करण्यात आलं होतं हे सांगण्यात आलं नाही. त्यानंतर कंपनीने बंदी घातलेल्या व्यक्तीचे आणि माझे नाव सारखंच असल्याने तिकीट रद्द करण्यात आलं. मात्र केवळ नाव सारखं असल्याने कंपनीने तिकीट रद्द केल्याचा मला राग आला. दोन व्यक्तींची नाव एकसारखी असू शकतात. पण नावं सारखी असल्याने तिकीट रद्द करणे चुकीचं आहे,” असं मत कुणालने व्यक्त केलं.

“आधी विमानतळावरील सुरक्षारक्षक आणि त्यानंतर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना तो कुणाल कामरा मी नाही हे पटवून दिल्यानंतर मला विमानात प्रवेश देण्यात आला. विमान कंपनीने माझ्या आधारकार्डची प्रत घेतली. मात्र विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी मला अडवून ठएवलं. आधी मी त्यांना भारतीय ओळखपत्र दाखवलं मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर अमेरिकेतील ओळखपत्र दाखवल्यावर त्यांची खात्री पटली आणि मला आतमध्ये सोडण्यात आलं,” असं कुणाल म्हणाला.

विशेष म्हणजे विमानतळावर पोहचल्यावर कुणालने इंडिगोचे तिकीट बूक केले. मात्र नावावरुन गोंधळ झाल्याने कुणालने आधीच इंडिगोच्या अधिकाऱ्यांना नाम साधर्म्य असल्याची माहिती दिली होती.