हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहिलेले हिरव्या रंगाचे फुगे सापडल्याने खळबळ उडाली आहे. कुरुक्षेत्र येथे ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2018’ सुरू आहे. रविवारी(दि.16) महोत्सवाच्या ठिकाणी काही लहान मुले खेळत असताना त्यांच्याकडे हे फुगे सापडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका होमगार्डने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी आदर्श पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

पोलीस अधिकारी सी. राम यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार होमगार्डनेच हे फुगे सर्वप्रथम पाहिले. काही लहान मुले या फुग्यांसोबत खेळत होते. हे फुगे कोण घेऊ आलं आणि कोणी लहान मुलांना ते खेळण्यासाठी दिले याबाबत आम्ही तपास करत आहोत. काही तरुणांनी हे फुगे आणले होते अशी माहिती आहे, मात्र अदयाप त्या तरुणांचा शोध लागलेला नाही, असं राम यांनी सांगितलं. पोलीस स्थानकाजवळही असाच एक फुगा सापडला असल्याचं पोलीस अधिक्षक सुरेंदर पाल सिंह यांनी सांगितलं. फुगे कोणी आणले आणि कोणी दिले याच्या तपासासाठी सीसीटीव्ही तपासले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

7 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान कुरूक्षेत्रमध्ये मॉरीशस आणि गुजरातच्या भागीदारीतून ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०१८’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.