अमेरिकेनंतर कुवेतने पाच देशांच्या नागरिकांना विसा देण्यास नकार दिला आहे. कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील शुक्रवारी सात मुस्लिम देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती. ‘ज्या देशांवर बंदी घातली गेली आहे, त्या नागरिकांनी विसासाठी अर्ज करु नये. या देशांच्या माध्यमातून दहशतवादी आमच्या देशात प्रवेश करु शकतात, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही पाच देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी करत आहोत,’ असे कुवेतने म्हटले आहे.

अमेरिकेच्याआधी कुवेतने सीरियातील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध लादले होते. कुवेतने २०११ मध्ये सीरियाच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली होती. सीरियन नागरिकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय कुवेतने २०११ मध्येच घेतला होता. गेल्याच आठवड्यात अमेरिकन प्रशासनाने सात मुस्लिम देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली. ‘सात देशांच्या नागरिकांवर घातलेल्या बंदीमागे कोणत्याही धर्माला लक्ष्य करणे हा हेतू नसून अमेरिकेचे संरक्षण हाच एकमेव हेतू आहे,’ असे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले होते.

व्हाईट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव सीन स्पाइसर यांनी ‘राष्ट्राध्यक्षांचे पहिले ध्येय अमेरिकेचे संरक्षण आहे. कोणत्याही धर्माला लक्ष्य करणे हा आमचा हेतू नाही. दहशतवाद ही धार्मिक समस्या नाही, असे राष्ट्राध्यक्षांचे मत आहे. ही समस्या कट्टरतेमुळे निर्माण झाली आहे. इस्लाम आणि आमचे नुकसान करण्यासाठी अमेरिकेत येणाऱ्या कट्टरतावादी इस्लामी दहशतवाद्यांमध्ये खूप फरक आहे,’ असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ जानेवारीला एका आदेशावर स्वाक्षरी केली. यामुळे सीरियातून येणाऱ्या शरणार्थींसह अन्य देशांच्या लोकांना अमेरिकेने प्रवेशबंदी लागू केली आहे. इराण, इराक, लिबिया, सुदान, येमेन, सीरिया आणि सोमालिया या देशांच्या नागरिकांवर बंदी घालण्यात आली. ‘हे निर्बंध मुस्लिमांवर लादण्यात आलेले नाहीत. माध्यमांनी रंगवलेले चित्र चुकीचे आहे. हा मुद्दा धर्माचा नाही. हा मुद्दा दहशतवाद आणि अमेरिकेच्या सुरक्षेसंबंधीचा आहे,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. जगातील मुस्लिमबहुल देशांची संख्या ४० हून अधिक आहे. मात्र यातील फक्त सात देशांच्या नागरिकांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.