शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी किरगिझस्तान येथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाटयाला एक वेगळा सन्मान आला. राजधानी बिश्केक येथे पोहोचल्यानंतर किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी समारंभपूर्वक मोदींचे स्वागत केले. त्याचवेळी तिथे पाऊस सुरु झाला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली होती.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. सरकारी कार्यक्रमांमध्ये अचानक पाऊस सुरु झाल्यास आपल्या नेत्याला त्रास होऊ नये यासाठी सुरक्षारक्षक डोक्यावर छत्री धरतात. पण बिश्केकमध्ये वेगळे दृश्य पाहण्यास मिळाले. जीनबीकोव्ह यांची ही विनम्रता पाहून मोदी सुद्धा भारावून गेले.

मागच्या आठवडयात श्रीलंकेमध्ये सुद्धा हेच दृश्य पाहायला मिळाले. कोलंबोमध्ये श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी समारंभपूर्वक मोदींचे स्वागत केले. त्यानंतर सिरीसेना यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली होती. दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या या कृती मोदींच्या मनाला स्पर्शून गेल्या असे सूत्रांनी सांगितले.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना जबाबदार ठरविण्याची मागणी
दहशतवादाला खतपाणी घालून त्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या देशांना दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) संघटनेच्या शिखर बैठकीत पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. मोदी यांनी शुक्रवारी या संघटनेची उद्दिष्टे व आदर्श यांवर भर देताना दहशतवादाचा मुकाबला करण्यात सहकार्य वाढवण्याच्या मुद्दय़ाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विविध देशांनी त्यांच्या संकुचित मनोवृत्तीतून बाहेर पडून काम केले पाहिजे, असा टोला त्यांनी तेथे उपस्थित असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना अप्रत्यक्षपणे लगावला. जे देश दहशतवादाला खतपाणी घालून निधी पुरवतात त्यांना उत्तरदायी ठरवले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.