नव्या वर्षात  ले.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. आता लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.

ले. ज. मनोज मुकुंद नरवणे हे लष्करप्रमुख या पदाचा पदभार बिपीन रावत यांच्या सेवा निवृत्तीनंतर स्वीकारणार आहेत. महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजे मनोज नरवणे हे होय.

१९८० मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे ते विद्यार्थी आहेत. त्यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.