गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींपेक्षा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काम अधिक उत्कृष्ठ असल्याचे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणून देणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपली तलवार आता म्यान केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. 
मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला अडवानी यांनीही होकार दिल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अडवानी यांनी मोदींच्या उमेदवारीला होकार दिल्याचे उच्चस्तरिय सूत्रांनी सांगितले. मोदी यांची पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्तीलाही अडवानी यांनी होकार दिला आहे. या आठवड्याच्या शेवटी पक्षाच्या गोव्यात होणाऱया कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राजनाथसिंह आणि अडवानी यांच्यात गोव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीची विषयपत्रिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत या विषयांवर चर्चा झाली.
गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात अडवानी यांनी मोदी आणि चौहान यांची तुलना केली होती. त्यावेळी त्यांनी मोदी यांचे काम चांगले आहे. मात्र, चौहान यांचे काम त्यांच्यापेक्षा अधिक चांगले असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अडवानी मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याच्या बाजूने नसल्याची चर्चा सुरू होती.