राज्यघटनेतील ३७० व्या कलमाला विरोध करणाऱया लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ‘ब्लॉग’वरील नवीन ‘पोस्ट’मध्ये देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे कौतुक केले. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणासाठी पटेल यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोध डावलून लष्करी बळाचा वापर केला. त्याबद्दल अडवाणी यांनी त्यांचे कौतुक केले.
पटेल यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांच्यासोबत काम करणारे व्ही. पी. मेनन यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा दाखल देत अडवाणी यांनी नेहरूंचा विरोध डावलून त्यावेळी पटेल यांनी हैदराबादमध्ये लष्कर पाठवले आणि त्या संस्थानाचा भारतात समावेश करून घेतला, असे म्हटले आहे.
याच ‘पोस्ट’मध्ये त्यांनी एम. के. के. नायर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचाही दाखला दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गाने हैदराबादचे भारतात विलीनीकरण करण्याचा नेहरूंचा विचार होता. मात्र, भारताच्या मागणीला प्रतिसाद न देणाऱया निजामाविरुद्ध लष्करी बळ वापरण्याचे पटेल यांनी ठरवले, असे या पुस्तकात लिहिलंय.
ज्या पद्धतीने हैदराबादचे भारतात विलीनीकरण करण्यात आले, ती आदर्शच मानायला हवी, असे अडवाणी यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्या पोस्टमध्ये त्यांनी जम्मू-काश्मीर आणि हैदराबादची थेट तुलना केलेली नाही.