संघाच्या हस्तक्षेपानंतर आपली नाराजी संपवून भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा मागे घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते व रालोआचे कार्यकारी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी लगेच कामाला लागले. भाजपमधील अंतर्गत कलह शमत नाही तोच आता भाजपप्रणीत रालोआमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरून कलहाला सुरुवात झाली असून तो शमविण्यासाठी अडवाणींनी आज बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे सर्वेसर्वा नितीशकुमारतसेच जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
नरेंद्र मोदी यांना भाजपमध्ये मिळालेली बढती आणि महाराजगंजमधील पराभव या दोन कारणांमुळे जदयुचे भाजपशी बिनसले असून, नितीशकुमार यांनी आता भाजपप्रणीत रालोआतून बाहेर पडून वेगळ्या मार्गाने जाण्याचा विचार सुरू केला आहे. महाराजगंज लोकसभा पोटनिवडणुकीत राजदचे उमेदवार प्रभुनाथ सिंह यांनी सत्ताधारी जदयुच्या पी. के. शाही यांचा १ लाख ३६ हजार मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत बिहारमधील भाजपच्या नेत्यांनी युतीचा धर्म न पाळता जदयु उमेदवाराच्या विरोधात काम केले आणि या निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिस्पर्धी नितीशकुमार यांच्यावर कुरघोडी करता यावी म्हणून बिहारच्या भाजप नेत्यांना सर्व साधनसामुग्रीसह नरेंद्र मोदी यांनी फूस लावली होती, असा जदयु नेत्यांना वास आल्यामुळे भाजप आणि जदयु यांच्यातील संशयकल्लोळ आणखीच वाढला आहे. त्यापाठोपाठ गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती होऊन नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे भाजप आणि जदयु यांच्यातील दुरावा आणखीच वाढला आहे. महाराजगंजमधील राजदचा विजय म्हणजे आपला विजय असल्याच्या आविर्भावात बिहारमधील भाजप नेते जदयुच्या पराभवावर प्रतिक्रिया देत असून नितीशकुमार सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवीत आहेत. बिहारच्या जदयु-भाजपमधील हा कलह चव्हाटय़ावर येऊनही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याचाही संशय आता जदयु नेत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
भाजपशी १७ वर्षांपासून असलेले नाते तोडण्याच्या जदयुच्या रणनीतीमागे मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यावर दबाव आणण्याचाही उद्देश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच नितीशकुमार यांच्यासारखा भरवशाचा सहकारी रालोआतून बाहेर पडल्यास त्याचा देशभरातील काँग्रेस आणि यूपीएविरोधी मतदारांमध्ये वाईट संदेश जाईल आणि भाजपला बचावाची भूमिका पत्करावी लागेल, असाही जदयुचा त्यामागचा हेतू आहे. मोदी आणि राजनाथ सिंह या डावपेचांना बधणार नाहीत, याची कल्पना असल्यामुळे अडवाणी यांनी नितीशकुमार आणि शरद यादव यांच्याशी आज संपर्क साधून त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आणि लोकसभा निवडणुकीत यूपीएला पराभूत करण्यासाठी भाजपची जास्तीत जास्त विरोधी पक्षांशी एकजूट असण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी भर दिला. दरम्यान, नितीशकुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर ठेवणाऱ्या नव्या ‘फेडरल फ्रंट’चा विचार सुरू केला आहे. मोदींच्या नावावर फेरविचार करण्यास भाजपला भाग पाडण्यासाठीच जदयुने हे दबावतंत्र अवलंबिले असल्याचे म्हटले जात आहे.