हिंमत, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही काम कठीण नसते. याचा प्रत्यय तामिळनाडूतील एम शिवागुरू प्रभाकरनकडे पाहिल्यानंतर येतो. देशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत आयएएससाठी त्याची निवड झाली आहे. २००४ मध्ये पैशांअभावी इंजिनिअर होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच सोडावे लागले होते. त्यानंतर आयएएस होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी असा आहे.

तंजावर जिल्ह्यातील पट्टुकोट्टईमधील मेलाओत्तान्काडू गावाचा रहिवासी असलेल्या प्रभाकरनचा प्रवास मद्यपी वडील, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमधून आता प्रतिष्ठित सेंट जॉर्ज फोर्टच्या परिसरापर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी यूपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात शिवागुरू प्रभाकरनने एकूण ९९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १०१ वी रँक प्राप्त केली आहे. शिवागुरूशिवाय तामिळनाडूतून व्ही. कीर्ति वासन (२९), एल. मधुबालन (७१) आणि एस. बालाचंदर (१२९) यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.

बारावीनंतर हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले होते. वडील सतत दारूच्या नशेत असत. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी प्रभाकरनवर येऊन पडलेली. प्रभाकरनने दोन वर्षे लाकूड अड्ड्यावर आणि शेतात मजुरी केली. त्याला कोणत्याही परिस्थिती आपल्या स्वप्नावर पाणी फेरायचे नव्हते.

२००८ मध्ये प्रभाकरनने लहान भावाचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आणि आपल्या बहिणीचे लग्नही केले. त्यानंतर त्याने आयआयटीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न घेऊन चेन्नई गाठले. तेथे तो दिवसभर अभ्यास करत आणि सेंट थॉमस माऊंट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर रात्र घालवत. मेहनतीच्या जोरावर प्रभाकरनने आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवला आणि २०१४ मध्ये एम.टेक पूर्ण केले. येथेही तो गुणवत्ता यादीत चमकला. त्यानंतर प्रभाकरनने चौथ्या प्रयत्नात यूपीएससीत यश मिळवले. त्याचा हा संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे.