करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३१ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशातील कामगार व मजूरांना बसला आहे. तेलंगणामधील एका बांधकाम मजुराने आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिरुमला लिंगस्वामी असं या मजुराचं नाव असून काही दिवसांपूर्वी तो हैदराबाद शहरात एका इमारतीवर बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. मात्र लॉकडाउनकाळात त्याचा रोजगार तुटल्यामुळे त्याला पैशांची चणचण भासत होती. यासाठीच लिंगस्वामीने आपल्या बहिणींना फोन करुन, मी आता आईची काळजी घेऊ शकत नाही असं सांगितलं. बुधवारी पहाटेच्या दरम्यान आपली आई झोपेत असताना लिंगस्वामीने तिच्यावर केरोसिन टाकून पेटवून दिलं. या प्रकारानंतर लिंगस्वामीने घटनास्थळावरुन पळ काढला. तेलंगणा पोलीस लिंगस्वामीचा शोध घेत आहेत.

पाच वर्षांपूर्वी लिंगस्वामीची आई घरातील बाथरुममध्ये घसरुन पडली होती. या अपघातात ६५ वर्षीय शांतम्मा यांचं हाड तुटल्यामुळे गेली ५ वर्ष त्या अंथरुणावर पडून होत्या. लिंगस्वामी आणि त्याच्या ३ बहिणींनी आईची काळजी घेण्यासाठी मदतनीसाची नेमणूक केली होती. मात्र लॉकडाउन काळात या मदतनीसाला वेळच्या वेळी पैसे मिळत नसल्यामुळे त्यानेही कामावर येणं बंद केलं होतं. लिंगस्वामीचे शेजारी शांतम्मा यांना जेवणं देत होते. शेजारील गावात राहणारी लिंगस्वामीची बहिण आठवड्यातून एकदा येऊन आईला आंघोळ घालण्यापासून सर्व काम करत होती, पण त्याव्यतिरीक्त शांतम्मा या घरात एकट्याच राहत होत्या. नालगोंडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक राजेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली.

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर लिंगस्वामी काही दिवस हैदराबादमध्ये आपल्या बांधकाम स्थळावर राहिला. मजुरांना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लिंगस्वामी आपल्या घरी परतला. मात्र लॉकडाउन काळात आईची मदत करण्यासाठी बहिणींना येणं शक्य होत नसल्यामुळे लिंगस्वामीला संताप आला. लॉकडाउनमध्ये शिथीलता आल्यानंतर त्याने बहिणींच्या घरी जाऊन यासंदर्भात वादही घातला. दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक चौकशी करत असून लिंगस्वामीला अटक करण्यासाठी विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे.