मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात जवळपास दीड कोटी किंमतीचा हिरा सापडल्याने चर्चेत आलेले मजूर मोतीलाल प्रजापती यांनी आपल्या निर्णयाने सगळ्यांची मनं जिंकली आहे. मोतीलाल प्रजापती खाणीत मजूर असून खोदकाम करताना त्यांना 42.9 कॅरेटचा हिरा सापडला आहे. यातून मिळणारे पैसे आपण आपल्या मित्रासोबत वाटून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपला सहकारी मित्र रघुवीर प्रजापती याला अर्धी रक्कम देण्याचं त्यांना ठरवलं आहे. कधीकाळी रघुवीर यांनी जमीन लीजवर घेण्यासाठी मोतीलाल यांनी 250 रुपये देत मदत केली होती.

मोतीलाल सांगतात की, ‘तो माझा सहकारी आहे. तो गरिब आहे. पैशांची माझ्यापेक्षा त्याला जास्त गरज आहे’. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘मला पैशांची गरज आहे आणि मी पैसे बँक खात्यात जमा होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. मात्र रघुवीरला या पैशांची जास्त गरज आहे. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे’.

मजुराचं नशिब फळफळलं , सापडला 42.9 कॅरेटचा मौल्यवान हिरा

मोतीलाल यांना बँकेत पैसे जमा होण्यासाठी अजून काही दिवसांची वाट पहावं लागण्याची शक्यता आहे. हिऱ्याचा लिलाव शक्यतो एक ते दोन आठवड्यात होऊन जातो. मात्र यावेळी निवडणूक असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत लिलावासाठी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी संतोष सिंह यांनी, आचारसंहिता लागू नसती तर 15 दिवसांत लिलाव झाला असता असं सांगितलं आहे.

मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिऱ्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. मोतीलाल प्रजापती या खाण मजुराला 42.9 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे. 42.9 कॅरेटचा हा हिरा या जिल्ह्याच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा हिरा असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी येथे 1961 मध्ये 44.55 कॅरेटचा हिरा सापडला होता. पन्ना येथील हिरा कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मजुर मोतीलाल आणि त्याच्या चार अन्य सहकाऱ्यांना हा हिरा सापडला. हिरा सापडल्यानंतर लगेचच मोतीलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात येऊन हिरा जमा केला, अद्याप या हिऱ्याचं मुल्यांकन करण्यात आलेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. तर हिरा कार्यालयातील अन्य एक अधिकारी संतोष सिंग यांनी हा हिरा मौल्यवान असून त्याची किंमत दीड कोटींपेक्षा जास्त असू शकते, असं सांगितलं.