परदेशातील उच्च राहाणीमान अनेकांना आकर्षित करत असल्याने, ते परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पहात असतात. परंतू, परदेशी नोकरीला ठोकर मारून देशसेवेची इच्छा उराशी बाळगणारे आदर्श तरूण अनेकांचे लक्ष वेधून घेतात. बरनाना याडगिरी हा असाच एक तरूण आहे. अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता या पठ्ठ्याने भारतीय लष्करातील नोकरीला प्राधान्य दिले. IIT (इंटरनॅशनल इंस्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हैदराबाद) मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतून नोकरीची ऑफर आली होती. परंतू बरनानाने ही ऑफर धुडकावून लावली. माध्यमांतील वृत्तानुसार बरनानाचे वडील हैदराबादमधील एका सिमेंटच्या फॅक्टरीत मजूर म्हणून काम करतात. बरनानाने अत्यंत कठीण परिस्थितीशी संघर्ष करत यशाचे शिखर गाठले आहे. गरिबीत बालपण घालवलेल्या बरनानाने घरची गरिबी कधीही आपल्या अभ्यासाच्या आड आणू दिली नाही. पहिल्यापासूनच तो अभ्यासात हुशार होता.

कठीण अशा ‘कॅट’ परिक्षेत त्याने ९३.४ टक्के मार्क प्राप्त केले होते. ही परिक्षा पास झाल्यावर लगेचच त्याला IIM इंदौरमधून नोकरीसाठी बोलावणे आले. लष्करात भरती होण्याची इच्छा असल्याने त्याने या नोकरीलादेखील नकार दिला. ९ डिसेंबरला ‘भारतीय लष्कर अकादमी’, डेहराडून (IMA)ची परीक्षा झाल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या एका तुकडीचा हिस्सा झाला. “माझे वडील अतिशय सर्वसामान्य व्यक्ती आहेत. कित्येक वेळा असे व्हायचे की माझे वडील दिवसाला केवळ ६० रुपये कमाई करायचे.” टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याने सांगितले.

‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स’मधील चांगल्या कामगिरीसाठी बरनानाचा ‘आयएमए’कडून प्रतिष्ठेचा सौप्य पदक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. या आनंदाच्या क्षणी त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. बरनानाने घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शिष्यवृत्ती प्राप्त करून शिक्षण पूर्ण केले. गरिबीचे चटके अनुभवलेल्या बरनानाने भरपूर पैसे कमवण्याचे स्वप्न उराशी बाळगले नाही. “माझ्याकडे कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होऊन रग्गड पैसा कमवण्याची संधी होती. परंतू माझ्या मनाला हा विचार कधीही शिवला नाही. मातृभूमीची सेवा करून मिळणारे समाधान, केवळ अर्थाजन करण्यात कधीच मिळू शकत नाही.” अशा शब्दांत बरनानाने भावना व्यक्त केल्या.